महागाईवरचं लक्ष वळवण्यासाठी अमरावती भडकवली, शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
महागाईचा प्रश्न विचारला तर भारत-पाकिस्तान, चीनची घुसखोरी, हिंदू-मुसलमान असे प्रश्न पेटवले जातात. या प्रश्नांशी सामान्य जनतेचा काहीही संबंध नाही. पण जनतेला या मुद्द्यात अडकवून ठेवलं जातं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
औरंगाबादः शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात आज 13 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad Strike) महागाईविरोधात मोर्चा काढण्यात आला. महागाईविरोधात देशभरात आंदोलन करणार असून त्याची ठिणगी औरंगाबादमध्ये पडली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोर्चातील भाषणात बोलताना केलं. तसंच देशातील प्रमुख प्रश्नांवरून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी भाजपने अमरावतीत आग भडकवण्याचे काम सुरू केल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. अमरावतीत काल झालेल्या हिंसाचारातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आज भाजपचे कार्यकर्ते आणि भला मोठा जमाव रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे शहरात दोन गटांतील तणावामुळे हिंसाचाराच्या घटना घडत आहे. यामुळे अमरावतीत दंगलसदृश्य परिस्थिती असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
महागाई म्हटलं की हिंदू-मुसलमान विषय निघतात- राऊत
महागाईविरोधातल्या आंदोलनात बोलताना संजय राऊत म्हणाले, महागाईविरोधातील लक्ष वळवण्यासाठी भाजप विविध फालतू मुद्द्यांना हात घालतं. महागाईचा प्रश्न विचारला तर भारत-पाकिस्तान, चीनची घुसखोरी, हिंदू-मुसलमान असे प्रश्न पेटवले जातात. या प्रश्नांशी सामान्य जनतेचा काहीही संबंध नाही. पण जनतेला या मुद्द्यात अडकवून ठेवलं जातं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील- राऊतांचा इशारा
महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचं काम करणाऱ्यांना संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले, आम्हाला व्यवस्थितपणे राज्य करू न देण्याचं हे कारस्थान विरोधी पक्षानं चालनलं आहे. केंद्र सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. पण एक लक्षात ठेवा, आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील, असं संजय राऊत म्हणाले. भगवा हातात घेऊन शिवसेना पुढे जात आहे, हे त्यांना देखवत नाही, म्हणून भाजप ही कारस्थानं करतंय, पण आम्ही तुमच्या छाताडावर पाय रोवून पुढे जाऊन दाखवू. उद्धव ठाकरे राज्यातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही प्रगती करतील, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.
इतर बातम्या