Rules For Bullock cart Race: औरंगाबाद जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीसाठी पहिला अर्ज, वाचा आणखी नियम व अटी
राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उच्च न्यायालयाने हटवल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात प्रथमच शर्यतीसाठीची परवानगी मागणारा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे. शर्यतीला परवानगी तर मिळाली, मात्र शर्यतीसाठीच्या नियम आणि अटींचे पालन करत शर्यत घ्यावी लागणार आहे.
औरंगाबादः सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला मंजुरी दिल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातल्या पहिल्या शर्यतीसाठीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाला आहे. राज्यात अशा स्पर्धांवरील बंदी हटल्यानंतर पहिली स्पर्धा नाशिकमध्ये भरवण्यात आली होती. तिथेही परवानगीशिवाय तसेच नियमांचे पालन न केल्यामुळे शर्यत घेतल्यामुळे चांगलाच गोंधळ माजला होता. आता औरंगाबादमधील आयोजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर अर्ज केला आहे, मात्र त्यातील नियम व अटी अधिकच किचकट असल्याचा सूर उमटत आहे.
50 हजार डिपॉझिट भरावे लागणार
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेतले जातात. पैठण, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यांमध्ये शंकरपट म्हणजेच बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. कोर्टाने लागू केलेल्या नियमांनुसार, अशा स्पर्धांसाठी 15 दिवस आधी परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथून अर्ज दाखल झाला आहे. या अर्जासाठी आयोजकांना 50 हजार रुपये डिपॉझिट भरावा लागणार आहे. तसेच इतर 12 प्रकारच्या अटींसह शर्यत घ्यावी लागणार आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी कोणत्या अटी?
– स्पर्धेच्या ठिकाणी वैद्यकीय सेवेसह रुग्णवाहिका सज्ज ठेवावी. – दोन्ही बाजूंनी कठडे तयार ठेवावे. चालकाला चाकात अडकतील असे कपडे परिधान करण्यावर मनाई आहे. – स्पर्धेचे अंतर 1 हजार मीटरपेक्षा जास्त नसावे. – महामार्ग, वाहतुकीच्या रस्त्यावर स्पर्धा घेण्यात येऊ नये. – एक बैलजोडी एका दिवसात तीनपेक्षा अधिक शर्यतीसाठी वापरू नये. – धावपट्टीवर आणण्यापूर्वी 20 मिनिटे आराम द्यावा. – केवळ एकच चालक बैलगाडीत असेल. – बैलांना त्रास होई, असे कुठलेच साधन (चाबूक, काठी, पिनरी, विजेचा धक्का देणारे साधन) वापरू नये. – बैलांचे शेपूटही पिरगाळू नये. – पाय बांधण्यासह लाथाबुक्क्या मारण्यावरही बंदी असेल. – गाडीला जुंपण्यात येणारी बैलजोडी एकमेकांशी सुसंगत असणे आवश्यक आहे. – बैलजोडीच्या आरामासाठी असलेल्या जागेत पुरेशी सावली, खाद्य, पिण्याचे पाणी, स्वच्छ परिसर असावा. – स्पर्धेच्या स्थळावर पशुवैद्यकीय सेवा, पशु रुग्णवाहिकेची सुविधा सज्ज ठेवावी. – बैलांना उत्तेजक द्रव्य, औषधी देऊ नये. बैलगाडी चालकानेही मद्य सेवन करू नये. – बैलांना दुखापत झाल्यास त्यांना शर्यतीत भाग घेता येणार नाही.
इतर बातम्या-