सुसाट पल्सरवर येत मोबाइल चोरणारे बंटी और बबली गजाआड, औरंगाबादेत पोलिसांनी रंगेहाथ पकडले
मागील दोन महिन्यांत शहरात अनेक ठिकाणी पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याच्या घटनांचे सत्र सुरु झाले. त्यात वेदांत नगर, क्रांती चौकातील निर्मनुष्य, उच्चभ्रू वसाहतीत वारंवार घटना उघडकीस येत होत्या. त्या धर्तीवर पोलिसांनी पाळत ठेवून दोघांना रंगेहाथ पकडले.
औरंगाबादः शहरातील रस्त्यांवर सुसाट वेगाने पल्सरवर येत पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावणाऱ्या बंटी आणि बबलीवर (Bunty And Babli) औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) कारवाई केली. वेदांत नगर येथे पोलिसांनी या जोडगोळीला रंगेहाथ पकडले. ऋषीकेश रोडे आणि मानसी रोडे असे या जोडीचे नाव असून मेहनत करून पैसा कमावण्याचा कंटाळा असल्याने दोघांनीही गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवल्याचे पोलिसांच्या चौकशीअंती उघड झाले.
वेदांत नगरात पोलिसांनी रंगेहाथ पकडले
मागील दोन महिन्यांत शहरात अनेक ठिकाणी पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याच्या घटनांचे सत्र सुरु झाले. त्यात वेदांत नगर, क्रांती चौकातील निर्मनुष्य, उच्चभ्रू वसाहतीत वारंवार घटना उघडकीस येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी साध्या वेशात, खासगी वाहनांतून गस्त सुरु केली. 6 डिसेंबर रोजी दहा वाजता नेहमीप्रमाणे गस्तीवर असताना पोलिसांना राम मंदिर परिसरातून आरडाओरडा ऐकू आला. यावेळी कन्नडवरून आलेल्या सुदर्शन दत्तात्रय गायके याचा मोबाइल हिसकावला होता. पथकाने तत्काळ चोरांचा पाठलाग सुरु केला आणि देवगिरी महाविद्यालयाजवळ त्यांना रंगेहाथ पकडले.
म्हणे मौजमजेसाठी चोरी!
बंटी आणि बबली नावाने प्रसिद्धी मिळावी, अशी इच्छा असलेल्या या जोडीने फक्त मौजमजेसाठी चोऱ्या सुरु केल्याचे पोलिसांना सांगितले. यातील मानसीचे ऋषिकेशसोबत तिसरे लग्न झाले आहे. पहिल्या पतीपासून एक मुलगी असून तिची आई सांभाळ करते. दोघंही शिवाजी नगरात खोली करून राहत होते. मौजमजेसाठी चोरी करत होते. रोज जेवायला बाहेर जाणे, हॉटेलमधून पार्सल मागवणे व रात्री चोरीसाठी बाहेर पडणे असा या जोडीचा नित्यक्रम होता.
इतर बातम्या-