संभाजीनगरातून मोठी बातमी | खा. इम्तिजाय जलील यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
गुरुवारी संध्याकाळी खा. इम्तियाज जलील यांनी हजारो समर्थकांना सोबत घेत शहराच्या नामांतराविरोधात कँडल मार्च काढला.
दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (Aurangabad) अर्थात नव्याने नामांतर झालेल्या छत्रपती संभाजीनगरातून (Sambhajinagar) मोठी बातमी हाती आली आहे. येथील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या सात दिवसांपासून खा. इम्तियाज जलील यांच्यासह अनेक नामांतर विरोधी संघटनांनी शहराच्या नामांतराविरोधात बेमुदत उपोषण सुरु केलंय. राज्य तसेच केंद्र शासनाच्या नामांतराच्या निर्णयाला या संघटनांनी विरोध केला आहे. याच आंदोलनााचा भाग म्हणून काल शहरात भव्य कँडल मार्च काढण्यात आला होता. या कँडल मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही खा. जलील यांच्या नेतृत्वात हजारो महिला आणि पुरुषांनी मेणबत्ती घेऊन मार्च केला. यामुळेच खा. इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सिटी चौक पोलीस चौकीत गुन्हा
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने शहरातून कँडल मार्च काढण्यास परवानगी नाकारली होती. तरीही मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांना सोबत घेत कँडल मार्च काढला होता. आता या विरोधात पोलिसांनी खा. जलील आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.
हजारो नागरिक रस्त्यावर
गुरुवारी संध्याकाळी खा. इम्तियाज जलील यांनी हजारो समर्थकांना सोबत घेत शहराच्या नामांतराविरोधात कँडल मार्च काढला. नामांतरविरोधी कृती समितीतील सदस्य तसेच हजारो महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत गुरुवारी रात्री कँडल मार्च काढण्यात आला. शहराचं नाव औरंगाबाद हेच कायम राहवं, अशी मागणी करत हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला. राज्य तसेच केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केलं आहे. याविरोधात औरंगाबाद नामांतर कृती समितीच्या वतीने मागील सात दिवसांपासून बेमुदत आंदोलन केलंय जातंय. याच आंदोलनाचा भाग म्हणून काल शहरात भव्य कँडल मार्च काढण्यात आला.