औरंगाबादः माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. बोर्डाकडून याकरिता तयारीदेखील सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी विभागीय मंडळाअंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित झाली आहेत. राज्य मंडळाचे अद्याप कोरोनासंबंधी नवे निर्देश न आल्यामुळे ऑफलाइन परीक्षेची तयारी बोर्डाकडून केली जात आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेसाठी विभागातून 1 लाख 79 हजार 486, तर बारावी परीक्षेसाठी 1 लाख 64 हजार 333 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 12 हजारांनी जास्त आहे. सध्या प्राथमिक पातळीवर केलेल्या नियोजनानासुर औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत दहावीसाठी 629, तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मात्र प्रसंगानुरुप विद्यार्थी संख्येनुसार, केंद्रात वाढ होऊ शकते, असे विभागीय मंडळाचे सचिव आर पी पाटील म्हणाले.
दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होईल. तर प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी सुधार परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च रोजी होईल.
तर बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी सुधार परीक्षा ही 14 फेब्रुवारी ते 3 मार्च आणि लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे.
इतर बातम्या-