तोंडोळी सामूहिक बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालवणार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तोंडोळी येथील पीडितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या दोघांचीही प्रकृती खालावल्यासारखी वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करा, असे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.
औरंगाबाद: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी शनिवारी तोंडोळी दरोडा आणि बलात्कार पीडितांची भेट घेतली. या प्रकरणी दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. तोंडोळी येथील दरोडेखोरांनी (Tondoli Robbery) लुटमारीसह तेथील महिलांनाही लक्ष्य केले होते. या सामुहिक बलात्काराचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर (Fast track court) चालवले जाईल व दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिले.
पीडितांना रुग्णालयात नेण्याचे निर्देश
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तोंडोळी येथील पीडितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या दोघांचीही प्रकृती खालावल्यासारखी वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करा, असे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्भया पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकाचे काम व्यवस्थित चालू आहे की नाही, याची वेळोवेळी तपासणी केली जाईल, अशी माहितीही चाकणकर यांनी दिली. यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे, रवींद्र सिसोदे आदी उपस्थित होते.
बिडकीन पोलीस ठाण्याला भेट
तोंडोळी येथील पीडितांच्या भेटीनंतर चाकणकर यांनी बिडकीन पोलीस ठाण्याला भेट दिली. येथे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संजय गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्यासोबत बैठक घेऊन पीडित महिलांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत तसेच शेतवस्तीवरील त्यांच्या घराला संरक्षण देण्याच्या सूचना केल्या.
मध्यप्रदेशातील कुटुंबावर पडला होता दरोडा
पैठण तालुक्यातील बिडकीजवळील तोंडोळी येथील शेतवस्तीवर तीन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कुटुंब राहण्यास आले होते. यात तीन पुरुष व चार महिला होत्या. दरोडेखोरांनी 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी मध्यरात्री कुटुंबावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. दरोडेखोरांनी कुटुंबातील पुरुषांना बाजूच्या खोलीत हातपाय बांधून कोंडले, तर बाहेर एकाच्या गळ्याला चाकू लावून चारपैकी दोन महिलांवर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. यातील पीडिता 31 आणि 32 वर्षीय असून, त्यांना दरोडोखोरांनी घराच्या बाजूला नेत अत्याचार केले. घरातील पुरुषांना शस्त्रांचा धाक दाखवून आधीच बांधून ठेवले होते त्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. एकाने मुकाबला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. तोंडोळी येथील या घटनेत दरोडेखोरांनी रोख 36 हजार आणि बनावट दागिने लंपास केले. तोंडोळी दरोड्यात दरोडेखोरांनी ज्या दोन महिलांवर बलात्कार केला, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. यापैकी एक महिला 15 दिवसांची बाळंतीण असल्याचे उघड झाले.
इतर बातम्या-