बावनकुळेंचं तिकीट कापलं, ऐनवेळी पत्नीचंही तिकीट कापलं अन् एकच रडारड सुरू झाली… अभिमन्यू पवार यांनी सांगितला तो किस्सा
भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या तिकीट कापल्याचा किस्सा सांगितला. महायुतीच्या सत्तेनंतर ऊर्जा मंत्री झालेल्या बावनकुळे यांचे तिकीट आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीचे तिकीटही कापले गेले. काय होता हा किस्सा? आमदार अभिमन्यू पवार पहिल्यांदाच बोलले.
राजकारणात अनेक चढ उतार होत असतात. आजचा दिवस उद्या सारखा नसतोच कधी. आधी सुपात असलेले नंतर तुपात जातात, तर कधी तुपातले सुपात जातात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबतही असंच घडलं. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर बावनकुळे यांना ऊर्जा मंत्रीपद मिळालं. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू समजले जाणाऱ्या बावनकुळे यांचं नंतरच्या निवडणुकीत तिकीट कापलं. त्यानंतर त्यांच्या पत्नीचंही तिकीट कापलं. पण नशीब काही एवढ्यावर थांबत नसतं. बावनकुळे यांनी संयम राखला अन् पुढे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. आमदार झाले आणि आता थेट महसूल मंत्री. पण बावनकुळे यांचं तिकीट कापल्याचा किस्सा मनोरंजक आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी हा किस्सा सांगितला.
लातूर जिल्ह्यातील औसाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांचा लातूरमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या तिकीट कापण्याचा किस्सा सांगितला. बावनकुळेंचं तिकीट कापलं. मी साक्षीदार आहे अनेक गोष्टीचा. त्यांनाही कळलं नाही. एवढा दिग्गज नेता. किमान 12 मतदारसंघावर पकड असणारा नेता. तिकीट कापलं. त्यानंतर बावनकुळे गपचूप बसले. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी खूप ताकद लावून शेवटी बावनकुळे यांच्या पत्नीला तिकीट मिळवून दिलं. त्यांच्या पत्नीला तिकीट द्यायचं असा वरून निरोप आला. बावनकुळे यांच्या पत्नीने फॉर्म भरला. रॅली निघाली. आणि ऐनवेळी त्यांच्या पत्नीचंही तिकीट कापलं. विचार करा काय अवस्था झाली असेल त्या माणसाची. अक्षरश: घरी रडारडी सुरू झाली. पण तरीही बावनकुळेंनी संयम राखला, असं अभिमन्यू पवार म्हणाले.
पक्षावर नाराज होऊ नका…
सावरकर म्हणून आपले कार्यकर्ते आहेत. त्यांना पक्षाने तिकीट दिलं. ते निवडून आले. बावनकुळे यांनी तिकीट कापल्यावर ब्र शब्द काढला नाही. कशामुळे झालं? का झालं? याबद्दल कधी बोलले नाही. शांत बसले. नंतर पक्षाने त्यांना आमदार केलं. प्रदेशाध्यक्ष केलं. आता महसूल मंत्री आहेत. ही भाजपची ताकद आहे. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना सल्ला देईल. काही मिळेल न मिळेल. सरकार आपलं आहे. अर्ध्याहून अधिक आपले मंत्री आहेत. कधी मिळालं नाही तरी पक्षावर नाराज होऊ नका. पक्षाच्या सुरात सूर मिसळा. सर्व मिळून जातं, असं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं.
फडणवीस पेशन्सचे मसिहा
पेशन्स ठेवलंच पाहिजे. मी चिखलाचा गोळा होतो. या गोळ्याला आकार देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पेशन्सचा मसिहा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. एखाद्या माणसाने किती पेशन्स ठेवावे, किती सहन करावं. किती अपमान सहन करावा. किती बोलणे खावे याला काही मर्यादा आहेत. पण फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षात काय सहन केले नाही. त्यांच्या कुटुंबावर टीका झाली. त्यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. त्यांच्या पत्नीवर टीका झाली. त्यांच्या शरीरावर टीका झाली. वैयक्तिक टीका टिप्पणी झाल्या. इतकं होऊनही त्यांचे पेशन्स किती आहेत बघा. अजूनही त्यांना कधी शब्द मागे घ्यावे लागले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
आणि त्या आमदाराला…
मी साधा कार्यकर्ता आहे. मी माझ्यातील कार्यकर्ता कधी मरू दिला नाही. मी नेता नाही, कार्यकर्ताच आहे. 2014मध्ये मुख्यमंत्रीपदाची निवड सुरू होती. हा नको तो नको असं चाललं होतं. एका आमदाराने फडणवीस यांच्या नावाला विरोध केला होता. तोच आमदार नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर चार सहा महिन्याने वर्षावर आले. मी कार्यकर्ताच. मी त्यांना 10 ते 15 मिनिटं आत सोडलं नाही. त्यांना गेटवरच ठेवलं होतं. माझ्या साहेबांना शिव्या दिल्यावर मी कशाला सोडू? मी त्याला एन्ट्रीच दिली नाही.
10 ते 15 मिनिटं गेटवर थांबले. नंतर उशीराने सोडलं. त्याने साहेबांकडे माझी तक्रार केली. साहेब काही बोलले नाही. ऐकून घेतले. साहेबांनी आपली कामं उरकून घेतले. गेटवर थांबवून ठेवल्याचा या आमदाराच्या मनात राग होताच. जाता जाता तो पुन्हा साहेबांना म्हणाला, याने मुद्दाम केलं. मुद्दाम मला थांबून ठेवलं. तेव्हा साहेब माझ्यावर थोडं रागावले. मी बहाणा करून वेळ मारून नेली. मी खोटं बोलतोय हे साहेबांच्या लक्षात आलं होतं.
नंतर मी त्या आमदाराचं पत्र पुढे पाठवलंच नाही. 20 दिवसानंतर त्या आमदाराने सर्वत्र पत्र शोधले. कोणत्याच अधिकाऱ्याकडे पत्र सापडलं नाही. त्यामुळे त्याने साहेबांकडे तक्रार केली. साहेबांच्या मग लक्षात आलं काही तरी गडबड आहे. मग साहेबांनी मला विचारलं. काय झालं? त्या आमदाराच्या पत्राचं काय झालं? तेव्हा मी त्यांना सर्व सांगितलं. मुख्यमंत्रीपदाच्या वेळी तो तुम्हाला शिव्या देत होता, म्हणूनच मी त्यांचं पत्र पुढे पाठवलं नाही असं सांगितलं. त्यावर साहेबांनी मला समजावलं.
साहेब म्हणाले, किती शिव्या दिल्या असतील?10-20…? त्याचं काम कर. त्याच्या शिव्या अर्ध्यावर आहेत. त्याचं काम वेळेवर करशील तर तो आपला होईल. असं करायचं नसतं वेड्या…, असा सल्ला साहेबांनी दिला. सांगायचं म्हणजे असं आम्हाला नेत्याने घडवलं. मला त्यांनी घडवलं. मी फडणवीस यांच्यासारखे पेशन्स कुठे पाहिले नाही. पेशन्सच्या बाबतीत मोदींशीच त्यांची तुलना होऊ शकते. मोदींनीही या 10 ते 5 वर्षात त्यांना अनेक शिव्या खाल्ल्या, असंही त्यांनी सांगितलं.