औरंगाबाद: जनतेला उपयुक्त कामे दर्जेदारपणे करण्यासाठी केंद्र-राज्य सरकारकडून महापालिकेला निधी दिला जातो. त्यानुसार नियोजन आणि प्रत्यक्षात दर्जेदार कामांसाठी महापालिकेत चांगली माणसे हवीत. म्हणून तुम्ही योग्य उमेदवार निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केले. शनिवारी आयएमए हॉलमध्ये अॅनेस्थेशिया डे (भूलशास्त्र दिन) निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अॅनेस्थेशिया डे (भूलशास्त्र दिन) निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, केंद्रात मंत्री झाल्यानंतर मी शहराच्या विकासासाठी विविध योजना आखत आहे. एम्ससाठी प्रयत्न सुरू आहेत. खासदार असताना मी जेरियाट्रिक विभागासाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळावा, घाटीत जेरियाट्रिक केंद्र घाटीत सुरू व्हावे यासाठी पुढाकार घेतला होता. आता मीच अर्थ राज्यमंत्री असल्यामुळे निधीची अडचण नाही. घाटीत जेरियाट्रिक सुरू करू. महापौर असताना जकात नाका, नारेगावला वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मंजूर केली होती. माझ्यानंतर त्याचा इतर महापौरांकडून पाठपुरावा झालाच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
औरंगाबादमध्ये एकेकाळी बालरोगतज्ज्ञ अशी ख्याती मिळवलेले डॉ. भागवत कराड म्हणाले, शहरातील साडेतीन हजार डॉक्टरांनी मंत्रिपद मिळाल्यावर माझे अभिनंदन केले. मी तुम्हा सर्व डॉक्टरांचा प्रतिनिधी आहे. शहराच्या विकासासाठी तुमच्या सूचना सांगा. त्या अमलात आणण्यासाठी निश्चित पुढाकार घेईन, असे आश्वासनही डॉय भागवत कराड यांनी दिले. या कार्यक्रमात डॉ. संगीता देशपांडे, डॉ. सुजाता झिने, डॉ. अर्चना मोहगावकर, डॉ. अजित घायाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
-1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक
-1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर
-2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर
-2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी
इतर बातम्या-
केंद्रीय मंत्री कसा झालो?; भागवत कराड यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?