धन्यवाद औरंगाबाद! महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांना भरभरून प्रतिसाद, शहरातील गणेशभक्तांचा बाप्पांना भावपूर्ण निरोप
औरंगाबाद: शहरातील गणेशभक्तांनी रविवारी गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पांना महापालिकेने आखून दिलेल्या नियमांनुसार विसर्जित करण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेने (Aurangabad Municipal corporation) यंदा शहरातील विविध झोनमध्ये एकूण 40 गणेमूर्ती संकलन केंद्रे नियोजित केली होती. या केंद्रांवर महापालिकेचे कर्मचारी आणि गणेशमूर्ती संकलनासाठीची वाहने सज्ज होती. या संकलित केलेल्या मूर्ती नऊ विहिरी, […]
औरंगाबाद: शहरातील गणेशभक्तांनी रविवारी गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पांना महापालिकेने आखून दिलेल्या नियमांनुसार विसर्जित करण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेने (Aurangabad Municipal corporation) यंदा शहरातील विविध झोनमध्ये एकूण 40 गणेमूर्ती संकलन केंद्रे नियोजित केली होती. या केंद्रांवर महापालिकेचे कर्मचारी आणि गणेशमूर्ती संकलनासाठीची वाहने सज्ज होती. या संकलित केलेल्या मूर्ती नऊ विहिरी, एका कृत्रिम तलावावर विसर्जित करण्यात आल्या. भक्तांनी शक्यतो घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे किंवा मनपाच्या संकलन केंद्रात (Ganesh Idol Collection Centers) मूर्ती द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. निर्माल्य संकलानासाठीही महानगरपालिकेने व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेला औरंगाबादकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला.
शहरात 100 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशमंडळे
यावर्षी शहरात १०० पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन झाली होती , तर तीस हजारांपेक्षा अधिक घरगुती गणपती बसवण्यात आले. कोरोनामुळे मिरवणुकींना परवानगी नाकारण्यात आली होती. महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे नागरिकांनीही स्वागत केले. मूर्ती संकलन आणि कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन मोहिमेला चांगलेच यश आल्याने महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
पोलिसांचाही चोख बंदोबस्त
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात काही अनुचित प्रकार घडू नये, तसेच लोकांनी रस्त्यांवर तसेच सार्वजनिक गणेशमंडळांच्या ठिकाणी गर्दी करू नये, यासाठी पोलिस विभागातर्फेही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्तांच्या नेतृत्वात तीन पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, 28 पोलिस निरीक्षक, 83 उपनिरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक, 1107 पुरुष पोलिस कर्मचारी आणि 171 महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
तुझ्या येण्याने हजारो हत्तींचे बळ मिळते- पीआय राजश्री आडे शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्येही दरवर्षी गणपती बाप्पांची स्थापना करण्यात येते. दहा दिवस पोलीस स्टेशनमध्ये बाप्पांची आरती होते. विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही अनेक पोलीस स्टेशनमध्ये गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली होती. काल बाप्पांना निरोप देताना दौलताबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ”बाप्पा … आज जात आहेस.. पुढच्या वर्षी ये.. आम्हा पोलीस भावंडाना सुरक्षित ठेव… तुझ्या गोड मूर्ती पुढे आमचे सर्व कष्ट फिके पडते… तुझ्या येण्याने आम्हाला हजारो हत्तीचे बळ येते… आणि ते मस्त वर्षभर तूझ्या आगमन पर्यंत टिकते… बाप्पा… निरोप घ्या … डोळ्याचा कडा ओल्या झालेल्या फक्त तुलाच कळतात… भेटू पुढच्या वर्षी”, अशी भावना दौलताबाद पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी व्यक्त केली.
वाळूजमध्येही भक्तांचा बाप्पांना भावपूर्ण निरोप
वाळूज महानगर परिसरातही रविवारी गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. या परिसरात स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने मूर्तींचे संकलन करून 14 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे शासनाकडून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्याने, यावेळी सार्वजनिक गणेश मंडळांची संख्याही मोठ्या प्रमाणावर घटली. यंदा मिरवणुकीवर बंदी असल्यामुळे बहुतांश ठिकाणी दुपारी आरतीनंतर मूर्ती एकत्रितरित्या जमा करून नियोजित ठिकाणी देण्यात आल्या.
इतर बातम्या-