औरंगाबादकरांनो.. पोलिसांच्या मदतीसाठी आता डायल करा 112 हेल्पलाइन क्रमांक, 5 मिनिटात मिळेल मदत
हा क्रमांक डायल केल्यानंतर लवकरात लवकर पोलीस तुमच्यापर्यंत पोहचतील. तसेच या योजनेकरिता एक चारचाकी आणि एक दुचाकी प्रत्येक ठाण्याला देण्यात आली आहे.
औरंगाबाद: एखाद्या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी किंवा संकटात सापडलेल्या शहरातील नागरिकांना आजवर 100 हा हेल्पलाइन क्रमांक वापरून पोलिसांना (Aurangabad police) माहिती देता येत होती. मात्र आता शहरातील नागरिकांना 112 हा हेल्पलाइन क्रमांक (Police Helpline number) वापरावा लागणार आहे. 112 नंबर डायल करताच नागरिकांना पाच मिनिटात पोलिसांची मदत मिळू शकेल. महाराश्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम अर्थात महाराष्ट्र आतत्कालीन प्रतिसाद यंत्रणे अंतर्गत (Maharashtra emergency response system) ही मदत पुरवली जाईल. यासाठी शहरातील 17 पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र चारचाकी आणि दुचाकी देण्यात आली आहे.
100 चे फोनही 112 क्रमांकावर वळवले जाणार
शहरात सुरुवातीलापासूनच शहरातील तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षासाठी 100 इमर्जन्सी क्रमांक होता. मात्र आता पोलिसांच्या मदतीसाठी 100 ऐवजी 112 क्रमांक डायल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर येणारे कॉलदेखील 112 वर वळवण्यात आले आहेत.
कॉल येताच लोकेशन कळणार
महाराष्ट्र राज्यात मुंबई आणि नागपूर येथे महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेचे नियंत्रण कक्ष आहेत. एखाद्या नागरिकाने 112 क्रमांकावर कॉल करताच हा कॉल नियंत्रण कक्षाला जाईल. तेथील कॉल स्वीकारणारी व्यक्ती तुमचे नाव आणि घटना काय आहे, एवढीच माहिती विचारेल. कॉल करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन पोलिसांना लगेच कळेल. या व्यक्तीचे लोकेशन डायल 112 च्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना कळेल. याआधारे पोलिसांना मदतीसाठीची पुढील कार्यवाही करणे सोपे जाईल.
112 डायल केल्यास तत्काळ मदत मिळेल
औरंगाबाद शहरातील नागरिकांना आता 112 या क्रमांकावर डायल करून मदत मागता येईल. हा क्रमांक डायल केल्यानंतर लवकरात लवकर पोलीस तुमच्यापर्यंत पोहचतील. तसेच या योजनेकरिता एक चारचाकी आणि एक दुचाकी प्रत्येक ठाण्याला देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या मदतीला त्वरीत धावून जाता येईल. – डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद.
200 पेक्षा जास्त पोलिसांना प्रशिक्षण
नागरिकांनी मदतीसाठी कॉल केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता येईल, एकाच वेळी अनेक कॉल आले आणि प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी कारणे सांगत असतील तर अशा वेळी सर्वप्रथम कोणत्या घटनास्थळी पोहोचावे, अशा विविध परिस्थितींचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले आहे. तसेच कॉल करणाऱ्या व्यक्तीला जलद गतीने कशी मदत करावी, याविषयी 200 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
इतर बातम्या-