औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची बुधवारी 8 जून रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये सभा होत आहे. औरंगाबादचे नामांतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची झालेली सभा, एमआयएमचे (aimim) नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणं आणि राज्यसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या रडावर नेमकं कोण राहणार आहे हे पाहणंही औत्सुक्याचं राहणार आहे. तसेच ही सभा विक्रमी गर्दीची आणि ऐतिहासिक करण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यातील गावागावात सभेचा प्रचार सुरू आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक कधीही लागू शकते या पार्श्वभूमीवर या सभेला अधिक महत्त्व आलं आहे. तसेच सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तिसरा टीझर जारी केला आहे. त्यातून उद्धव ठाकरे सभेत काय बोलणार याची झलकही पाहायला मिळत आहे.
होय, हे संभाजीनगरच… उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेचा टीझर जारी#cmuddhavthackeray #shivsena #Aurangabad #BJP pic.twitter.com/4TNtPO2qxl
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 6, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचा तिसरा टीझर आला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे एका सभेला संबोधित करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… हे आहेच ना संभाजीनगर. हिंदू आहोत आम्ही. हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं, असं उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत. टीझरच्या शेवटी देव… देश आणि धर्म हेच शिवसेनेचे मर्म… ही कॅच लाईन टाकण्यात आली आहे. तसेच येत्या 8 जून रोजी सायंकाळी 6 वाजता औरंगाबादच्या मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार असल्याचं या टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये सभेची विराट गर्दी दाखवण्यात आली आहे. या आधीच्या टीझरमध्येही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण दाखवलं होतं.
शिवसेनेने या सभेच्या निमित्ताने काही पोस्टर्सही काढले आहेत. गोदावरी, मांजरा, पूर्णा… शिवसेनेची प्रेरणा…, जिथे वृत्ती रझाकारी, तिथे शिवसेनाच वार करी…, असं लिहिलेली पोस्टर्सही या निमित्ताने शिवसेनेने जाहीर केली आहेत. या पोस्टर्सचीही प्रचंड चर्चा होत आहे.
यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये विराट सभा घेतली होती. या सभेत त्यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं होतं. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं होतं. त्यामुळे राज यांच्या या सभेची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सभा कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.