औरंगाबादकरांनो, लोडशेडिंगचे संकट घोंगावतेय.. 6 ते 10 या वेळेत जपूनच वीज वापरा, महावितरणचे आवाहन!
औरंगाबाद: कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील एकूण 3330 मेगावॉट क्षमतेचे संच बंद पडले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरात लोडशेडिंग अटळ असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे विजेची तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांनीही वीजेचा वापर जपून करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 6 ते 10 वीज जपूनच वापरा! दरम्यान, विजेची तूट […]
औरंगाबाद: कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील एकूण 3330 मेगावॉट क्षमतेचे संच बंद पडले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरात लोडशेडिंग अटळ असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे विजेची तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांनीही वीजेचा वापर जपून करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
6 ते 10 वीज जपूनच वापरा!
दरम्यान, विजेची तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते 10 या वेळेत विजेचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
देशभरात कोळसा टंचाई
अतिवृष्टीमुळे खाणींमधून कोळशाचा पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच औष्णिक वीजनिर्मिती घटली आहे. महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 13 संच कोळशा अभावी बंद आहेत. महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस 250 मेगावॅटचे आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद आहे. कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे 640 मेगावॅटचे चार संच आणि अमरावतीतील रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतून मिळणाऱ्या विजेत घट झाली आहे.
लोडशेडिंगचा निर्णय राज्यस्तरावर होईल!
भारनियमन करावे लागेल अशी सध्यातरी परिस्थिती नाही. जास्तीत जास्त वीज खरेदीचा पर्याय आहे. सध्या ओपन मार्केटमधून वीज खरेदी सुरू आहे. राज्यात सध्या 13 संच बंद पडलेले आहेत. परंतु परिस्थिती बिघडली तर शेती पंप, शहरांसाठी भारनियमनाची शक्यता आहे. शहरात ज्या ठिकाणी वीज चोरी व गळती अधिक आहे अशा ठिकाणी भारनियम होऊ शकते. परंतु याचा निर्णय राज्यस्तरावरून होईल, अशी माहिती सुंदर लटपटे, महावितरण मुख्य अभियंता, लातूर, बीड, उस्मानाबाद यांनी दिली.
परळीत दोन दिवसांचाच कोळसा उपलब्ध
परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कार्यान्वित तीन संचांपैकी दोन संचांतून वीजनिर्मिती होत आहे. सध्या दोन दिवस पुरेल एवढा कोळसा उपलब्ध असल्याचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सांगितले. 750 मेगावॅट विजनिर्मितीची क्षमता असलेल्या या केंद्रातून सध्या 365 मेगावॅट म्हणजेच निम्म्याने विजनिर्मिती होत आहे. सध्या 12 हजार मेट्रिक टन कोळशाचा साठा असला तरी दोन दिवसांत कोळसा आला नाही तर विजनिर्मिती ठप्प होऊ शकते.
परभणी : वीजनिर्मिती घटल्याने आता संकट
वीजनिर्मितीमध्ये घट झाल्याने आगामी काळात भारनियमनाची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी शेतीला कृषिपंपासाठी 18 तास वीजपुरवठा देण्यात येत होता, परंतु सध्या कृषिपंपांसाठी सायंकाळी 6 ते रात्री 10 ही वेळ सोडून उर्वरित कालावधीत 8 तास वीज देण्यात येत आहे. त्यामुळे सकाळ, सायंकाळ 6 ते 10 या वेळेत आवश्यक तेवढ्याच विजेचा वापर करावा. एसीचा वापर शक्यतो टाळावा. गरजेपुरतेच पंखे आणि दिवे लावावेत, असे आवाहन महावितरणचे जनसंपर्क अधिकारी धनंजय पवार यांनी केले.
इतर बातम्या-