Corona Updates: औरंगाबादेत ओमिक्रॉनचे 14 रुग्ण ठणठणीत, मराठवाड्याची स्थिती काय?
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मिळून मागील 24 तासात 2523 कोरोनाबाधित आढळले. सर्वाधिक 658 रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळले. नांदेडमध्ये 643 तर लातूर जिल्ह्यात 543 रुग्ण आढळले.
औरंगाबादः जिल्हाभरात सोमवारी केवळ एकाच दिवसात 14 रुग्णांना ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ माजली. मात्र या सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याने योग्य ती काळजी घेतली जात आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा (Dr. Paras Mandlecha) यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात यापूर्वी 5 रुग्णांना ओमिक्रॉन झाल्याचे निष्पन्न झाले होते. ही संख्या गृहित धरता आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे.
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती
औरंगाबाद- 19 उस्मानाबाद- 11 लातूर- 3 नांदेड- 3 जालना- 3
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णसंख्येत घट
सोमवारी औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. सोमवारी शहरात 330 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णांची संख्या 2 हजार 762 एवढी झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आटवड्यात शंभरपर्यंत असलेली कोरोनाबाधितांची संख्या दुसऱ्या आठवड्यात तीनशे ते पाचशेदरम्यान झाली होती. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. मात्र कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी दिली. तसेच कोव्हिड सेंटर सुरु करून वॉररुममधून रुग्णांना संपर्क करीत उपचाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणीही घेण्यात आली. याचा परिणाम म्हणून आता जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या घटलेली दिसून आली.
मराठवाड्यातील एकूण आकडा काय?
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मिळून मागील 24 तासात 2523 कोरोनाबाधित आढळले. सर्वाधिक 658 रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळले. नांदेडमध्ये 643 तर लातूर जिल्ह्यात 543 रुग्ण आढळले. लातूरमधील दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 23.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. बीड- 125, जालना- 185, परभणी 101 तर हिंगोली जिल्ह्यात 74 रुग्ण आढळले. मात्र कोरोना रुग्णांमध्ये तीव्र लक्षण आढळून येत नसल्याने प्रशासन यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
इतर बातम्या-