राज्यातील 14 जिल्ह्यांचे निर्बंध शिथिल, पण औरंगाबादचं नावच नाही, काय आहे कारण?
जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्य शासनाकडे एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने हा प्रस्ताव सध्या तरी फेटाळून लावल्याचे चित्र आहे. याचे कारण शोधले असता, औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरणाचा कमी आकडा हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे.
औरंगाबादः कोरोना आणि ओमिक्रॉनच्या (Corona and Omicron) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) लावलेले निर्बंध हळू हळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची आकडेवारी नियंत्रणात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला राज्य सरकारने 14 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यात औरंगाबाद जिल्ह्याचं (Aurangabad District) नाव नाही. जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्य शासनाकडे एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने हा प्रस्ताव सध्या तरी फेटाळून लावल्याचे चित्र आहे. याचे कारण शोधले असता, औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरणाचा कमी आकडा हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे.
मराठवाड्यातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही
शासनाने निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आदी जिल्ह्यांचा यात समावेश आहे. मात्र मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना अ श्रेणीत येण्यासाठी लसीकरणाचा टक्का वाढवावा लागणार आहे. पहिला डोस घेण्याचे प्रमाण जास्त असले तरी दुसरा डोस घेण्यात जिल्हे मागे आहेत.
निर्बंध शिथिलीकरणाचे निकष काय?
राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्के आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्के आहे, त्याच जिल्ह्यांचे निर्बंध राज्य सराकारने मागे घेतले आहेत. औरंगाबाद जिल्हा मात्र या दोन्ही निकषात बसत नाही. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यातील निर्बंध कायम आहेत. – सद्यस्थिती पाहिली असता औरंगाबाद जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 82 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 52 टक्के आहे. त्यामुळे औरंगाबाद इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे पडला आहे. जिल्ह्यात 34 लाख 38 हजार 500 लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 28 लाख 46 हजार 854 आहे. तर 18 लाख 599 नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
औरंगाबादेत अजूनही कोणते निर्बंध?
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही औरंगाबादेतील लसीकरण कमी असल्यामुळे जिल्ह्यात पुढील निर्बंध सध्या तरी कायम आहेत. – सिनेमागृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट, हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरु आहेत. – विवाह समारंभातील गर्दीवरही बंधन आहेत. – पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे सुरु आहेत. मात्र येथेही लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच प्रवेश देण्याच यावा, असा नियम आहे. – 15 ते 18 वयोगटातील तसेच त्यापुढील नागरिकांनी दोन्ही डोस आणि फ्रंटलाइन वर्कर्सना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र नागरिकांचा यासाठी प्रतिसाद मिळत नाही.
इतर बातम्या-