औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU Aurangabad) आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापकांसाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान (9 दिवस) कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. राज्य शासनाने सुरु केलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट औरंगाबाद मनपाला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य कोविड-19 अर्थात कवचकुंडल मोहिमेअंतर्गत लसीकरण केले जाणार आहे. ज्यांनी अद्याप लसीकरणाचा एकही डोस घेतला नाही, किंवा एक झाला दुसरा बाकी आहे, अशा विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी संबंधित महाविद्यालय किंवा विद्यापीठात जाऊन लस घ्यायची आहे. प्राचार्य आणि संस्थाचालकांनी या मोहिमेसाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही डॉ. निंबाळकर यांनी दिल्या आहेत. दरम्यान, विवेकानंद कला, सरदार दलीपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मनपातर्फे सोमवारी (25 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजेपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रशासकीय अधिकारी प्रभाकर मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास वनारे, उपप्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे, उपप्राचार्य डॉ. आर. बी. शेजूळ यांनी केले आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 21 ऑक्टोंबर 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाविद्यालयीन 18 वर्षावरील विद्यार्थ्यी, विद्यार्थिनीं व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कोविड लसीकरण 100% करून घेण्यासाठी मिशन युवा स्वास्थ राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. औरंगाबाद शहराच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय-निमशासकीय व खाजगी महाविद्यालय दिनांक 20 ऑक्टोंबर 2021 पासून सुरू झाली आहेत. या महाविद्यालयातील 18 वर्षावरील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे covid-19 लसीकरण पहिला व दुसरा डोस पूर्ण करून घेण्यासाठी 25 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर 2021 दरम्यान मिशन युवा स्वास्थ महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे .या काळात मनपा आरोग्य विभागातर्फे शहरातील सर्व महाविद्यालयात covid-19 लसीकरणासाठी पथक पाठवले जाणार असून 100% लसीकरण करून घेण्यात येणार आहे.
covid-19 लसीकरणासाठी महानगरपालिका औरंगाबादला दिलेले उद्दिष्ट 10, 55, 600 इतकी असून 9, 36, 082 इतके साध्य झाले आहे. त्यातील पहिला डोस 5,87, 717 ( 55.68%) झाली आहे तर दुसरा डोस 3,48,365( 33%) झाले आहेत. मिशन युवा स्वास्थ्य मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढे यावे तसेच औरंगाबादकरांनी 100% लसीकरण करून घ्यावे त्यांच्यासाठी शहरात 75 ते 80 बुथ दररोज सुरु ठेवण्यात येणार असून ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही त्यांनी बुथवर जाऊन लसीकरण करून करून घ्यावे, असे आवाहन डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केले आहे. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात 85 ते 90 महाविद्यालय असून आरोग्य विभागाने महाविद्यालयांशी संपर्क करून covid-19 लसीकरण सत्राच्या तारखा निश्चित केल्या जात आहेत.
इतर बातम्या-