बुल्लीबाई अॅपविरुद्ध औरंगाबादेत गुन्हा दाखल, केंद्र सरकार मूग गिळून बसलंय का? वकील आस्मा शेख यांचा सवाल
देशभरात गाजत असलेल्या सुल्ली डील व बुल्लीबाई अॅपवरून (Bullibai App) मुस्लिम महिलांची बदनामी होत असून या अॅपच्या निर्माता आणि चालकांविरुद्ध औरंगाबादच्या अॅड. आस्मा शेख यांनी गुन्हा दाखल केला आहे.
औरंगाबादः देशभरात गाजत असलेल्या सुल्ली डील व बुल्लीबाई अॅपवरून (Bullibai App) मुस्लिम महिलांची बदनामी होत असून या अॅपच्या निर्माता आणि चालकांविरुद्ध औरंगाबादच्या अॅड. आस्मा शेख यांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या तक्रारीविषयी सविस्तर भूमिका मांडली. या अॅपमुळे मुस्लिम महिलांना समाजात वावरणे असुरक्षित वाटत असून अॅप तयार कऱणारे आणि ते चालवणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाल्या अॅड. आस्मा शेख?
या अॅपवर 18 ते 70 वर्षांच्या महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची बोली लावण्यात आली. अजित भारती या व्यक्तीने ट्विटरवरून ही माहिती दिली. मात्र 13 जुलै 2021 रोजी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे मी तक्रार दिली, मात्र अद्याप यावर कारवाई झालेली नाही. राज्यातही या प्रकरणी आवाज उठवण्यात आला. औरंगाबादेत पोलीस आयुक्तांनी तक्रार दाखल करून घेतली. या अॅपमुळे महिलांना समाजात वावरणे असुरक्षित वाटत आहे, महिलांच्या स्वातंत्र्याला यामुळे बाधा पोहोचत आहे. किती महिलांचे फोटो यावर अपलोड केले आहेत, याची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध नाही. पण ज्यांचे फोटो अशा पद्धतीने अॅपवर टाकले गेले असतील त्यांनी आवर्जून तक्रार दाखल करावी, असे आवाहन मी करत आहे.
केंद्रातल्या महिला मंत्री गप्प का?
मुस्लिम महिलांची अशा प्रकारे बदनामी होत असताना केंद्र सरकार मूग गिळून बसले आहे का, आगामी पाच राज्यांती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. केंद्रातील महिला मंत्र्यांनीही याविषयी एकही शब्द काढला नाही. त्या गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
इतर बातम्या-