औरंगाबाद: गेल्या आठवड्यात शुक्रवारी शिवाजीनगर भाजीमंडईत एका महिलेसह पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी टिप्या ऊर्फ शेख जावेद शेख मकसूद (Shekh Javed Shekh Maksud) अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडत नाहीये. एकेकाळी पोलिसांचा खबरी म्हणून काम करणाऱ्या टिप्याच्या गुन्ह्यांची यादीही मोठी आहे. मात्र पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने टिप्याचे गुन्हे वाढतच गेले. आता त्याच्या कृत्यांना आवर कसा घालायचा, हे पोलिसांसमोरचे (Aurangabad crime branch) मोठे आव्हान आहे.
शिवाजीनगर येथील भाजीमंडईत एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सीताराम केदारे यांच्या अंगावर कुख्यात टिप्याने गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने एका महिलेलाही धडक दिली. केदारे यांनी त्याला अडवले असताना टिप्याने शिवीगाळ केली. त्यानंतर हा टिप्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निसटला. जाता जाता केदारे यांच्या अंगावर त्याने गाडी घातली. तेव्हा प्रसंगावधान राखत त्यांनी बाजूला उडी घेतली. मात्र घटनास्थळावरून जाताना टिप्याने ‘मै तेरे को देख लुंगा’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादित म्हटले आहे. तेव्हापासून पुंडलिक नगर पोलिस स्टेशनचे दोन पथक आणि गुन्हे शाखेचे एक पथक टिप्याच्या मागवर आहेत.
दोन दिवसांपूर्वी टिप्या येवल्यात नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पथकाने येवल्यातील त्या घरावर छापा टाकला. मात्र पोलीस येण्यापूर्वीच तो फरार झाला होता. पाच वर्षांपासून टिप्याने शहरात दहशत माजवली आहे. मात्र आता त्याच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
टिप्या हा अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात आहे. पूर्वी तो पोलिसांना गुन्ह्याविषयी माहिती देत असे. म्हणजेच पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करत असे. स्वतःला मौत म्हणवणारा टिप्या गुन्हे करता करता पोलिसांना इतर गुन्हेगारांची टिपही देत असे. टिप्याकडून पोलिसांना गुन्ह्यांची माहिती मिळत असे म्हणून त्याच्या गुन्ह्यांकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केले. बघता बघता टिप्या अट्टल गुन्हेगार झाला. आता टिप्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याच्यावर चारपेक्षा जास्त खून, अनेक विनयभंग, लूटमार, जबरी चोरी, खंडणी, व्यापाऱ्यांना धमकावणे, खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्हे दाखल आहेत. (Criminal Tipya from Aurangabad again escaped from Yeola, Nashik)
इतर बातम्या-