डॉ. राजन शिंदे खून प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करावा, विविध सामाजिक संघटनांची मागणी
औरंगाबादः शहराला हादरवून सोडलेल्या डॉ. राजन शिंदे (Dr, Rajan Shinde) खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असला तरीही अजूनही या प्रकरणी असंख्य प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. पोलिसांनी (Aurangabad police) या खूनात एका अल्पवयीन मुलाला अटक केली असली तरीही अजून अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण मिळालेले नाही. एकटा अल्पवयीन मुलगा एवढी निर्घृण हत्या करू शकत नाही. त्यामुळे शिंदेंच्या खुनाची […]
औरंगाबादः शहराला हादरवून सोडलेल्या डॉ. राजन शिंदे (Dr, Rajan Shinde) खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असला तरीही अजूनही या प्रकरणी असंख्य प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. पोलिसांनी (Aurangabad police) या खूनात एका अल्पवयीन मुलाला अटक केली असली तरीही अजून अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण मिळालेले नाही. एकटा अल्पवयीन मुलगा एवढी निर्घृण हत्या करू शकत नाही. त्यामुळे शिंदेंच्या खुनाची सीआयडीमार्फत (CID Investigation) चौकशी करण्यात यावी, असा सूर बुधवारी झालेल्या शोकसभेत उमटला.
शोकसभेत अनुत्तरीत प्रश्नांवर चर्चा
मौलाना आझाद संशोधन केंद्रात प्रा. राजन शिंदे मित्रपरिवारातर्फे आयोजित शोकसभेस आमदार नारायण कुचे, श्रावण गायकवाड, ग. मा. पिंजरकर, प्रा. डॉ. गोपाळ बछिरे, रमेश विठोरे, प्रमिला चिंचोले, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. एम. ए. बारी, सुभाष बरोदे, जवाहर भगुरे, गजानन जोहरे, मोहन पठ्ठे, सतीश गोरे, विनोद सोनवणे, प्राचार्य डॉ. रामदास वनारे, माजी नगरसेवक मनोज गांगवे, संजय इंगळे आदी उपस्थित होते. कुचे म्हणाले की, प्रा. शिंदे यांच्या रूपाने आपण एक हुशार व्यक्तिमत्त्व गमावले. प्रा. डॉ. बछिरे म्हणाले की, अल्पवयीन मुलानेच खून केला असे होऊ शकत नाही. जी मुलगी साधी पाल किंवा झुरळ दिसले तरी ओरडते ती बापाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ओरडली नाही. तिची आई एकीकडे सकाळी 7 वाजता मृतदेह पाहिला म्हणते, तर दुसरीकडे उस्मानाबादच्या प्राध्यापकाला पहाटे 5 वाजून 12 मिनिटांनी कॉल करून राजन यांचा खून झाल्याचे सांगते. यावरून ही घटना संशयास्पद घटना असल्याचे स्पष्ट होते. डॉ. वनारे म्हणाले की, समाजाकडे लक्ष दिल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले अन् घात झाला. विनोद सोनवणे यांनी शिंदेंवर लिहिलेल्या ‘बाप हिटलर कसा’ या कवितेवर शोकसभेत सविस्तर चर्चा झाली. या वेळी संतोष बारसे, गणेश भाग्यवंत, सुरेश गवळे, रघुनाथ पद्मे, विष्णुपंत पद्मने यांचीही उपस्थिती होती.
बहुचर्चित खून प्रकरण
शहरातील सामाजिक वर्तुळात नामांकित व्यक्तीमत्त्व असलेले डॉ. राजन शिंदे हे मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक होते. 11 ऑक्टोबर रोजी पहाटे त्यांच्या सिडको येथील राहत्या घरात निर्घृण खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी असंख्य लोकांची चौकशी करण्यात आली. अनेक जबाब नोंदवण्यात आले. अखेर गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना घराच्या परिसरातील भल्या मोठ्या विहिरीतील कचरा आणि पाणी उपसावे लागले. साधारण 2 लाख रुपये खर्च करून विहिर उपसल्यानंतर विहिरीच्या तळाशी खूनासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे सापडली. 18 ऑक्टोबर रोजी ही शस्त्रे सापडल्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन मारेकऱ्याला ताब्यात घेतले.
आरोपी सज्ञान होण्यास 4 महिने बाकी
आरोपीला सज्ञान होण्यास म्हणजे 18 वर्षे पूर्ण होण्यास फक्त चार महिने बाकी आहे. विशेष म्हणजे हा आरोपी लॉच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याच्यावर बाल न्यायालयात खटला चालेल. चार महिन्यांनी तो सज्ञान जरी झाला तरी ज्युवेनाइल जस्टिस अॅक्टनुसार शिक्षा देण्यात येईल. त्याला तुरुंगात पाठवण्यात येणार नाही. त्याच्या सुधारणेसाठी निरीक्षणगृहातच प्रयत्न केले जातील. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांत असे बाल गुन्हेगार सापडले आहेत. त्यातील कोणालाही भारतीय दंडविधानानुसार शिक्षा झाली नसल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ विजय सपकाळ यांनी सांगितले.
इतर बातम्या-
पत्नीसोबत वादानंतर पतीची आत्महत्या, घाटात झाडाला गळफास, पुण्यात खळबळ