पर्यटनमंत्री साहेब! दौऱ्यावर आहातच तर आम्हालाही भेटा, औरंगाबादच्या पर्यटन व्यावसायिकांचे आदित्य ठाकरेंना साकडे!
मागील दोन वर्षांत पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना सोबत न घेता फक्त आदेश निघतात. पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिकांचे म्हणणे कधीही ऐकून घेतले जात नाही. इथून पुढे कोणताही आदेश जारी करण्यापूर्वी किमान या क्षेत्रातील व्यवसायिकांशी चर्चा करावी, ज्यामुळे व्यवसायिक व सरकार यांच्यात ताळमेळ साधला जाईल, अशी अपेक्षा औरंगाबाद टुरिज्म डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
औरंगाबादः महाराष्ट्र राज्याचे पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज शहरात येत आहेत. यावेळी ते अजिंठा आणि वेरुळ लेण्यांना भेट देणार आहेत. ‘खुद्द पर्यटन मंत्री अजिंठा आणि वेरुळला भेट देत आहेत ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे आमचे दुःख किंचीत का होईना ते समजू शकतील. या दौऱ्यात आम्हाला प्रत्यक्ष भेटून आमचे म्हणणे ऐकूण घेतल्यास आम्हाला अधिक आनंद होईल’, असे मत पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. औरंगाबाद टुरिज्म डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे (Aurangabad tourism Development Foundation ) अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत यांनी व्यावसायिकांच्या वतीने ही मागणी केली आहे.
25 हजाराहून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह
पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिकांनी सांगितले की, येत्या मार्चमध्ये लॉकडाऊनला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात जवळपास पर्यटन व पर्यटनावर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय बंद असून त्यावर अवलंबून असलेली कुटूंबांची आर्थिक होरपळ होत आहे. यात प्रामुख्याने छोटे व्यावसायिक, बस, टॅक्सी, हॉटेल, गाईड आणि टूर ऑपरेटर्सचा समावेश आहे. पर्यटन उद्योगावर औरंगाबादमधील 25 हजारांहून अधिक कुटूंबांचा उदरनिर्वाह होतो. पर्यटन वगळता इतर सर्व उद्योग व व्यवसायांना कोविड अटी व शर्थींसह सुरु आहेत. एकट्या पर्यटन उद्योगाला सरकारकडून सावत्र वागणूक दिली जात आहे. कोविडचे सर्व नियम व अटी पाळून पर्यटन उद्योगाला चालना देणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांत बहुतांश लहान-मोठे सर्व पर्यटन व्यवसायिक संपत आले आहेत किंवा संपले आहेत. अद्यापही वेळ गेलेली नसून इथून पुढे पर्यटन स्थळे व पर्यटन बंद न करता नियम व अटींसह सुरु करण्याची तात्काळ परवानगी देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.
व्यावसायिकांशी चर्चा करण्याची अपेक्षा
तसेच मागील दोन वर्षांत पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना सोबत न घेता फक्त आदेश निघतात. पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिकांचे म्हणणे कधीही ऐकून घेतले जात नाही. इथून पुढे कोणताही आदेश जारी करण्यापूर्वी किमान या क्षेत्रातील व्यवसायिकांशी चर्चा करावी, ज्यामुळे व्यवसायिक व सरकार यांच्यात ताळमेळ साधला जाईल, अशी अपेक्षा औरंगाबाद टुरिज्म डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, सुनीत कोठारी, अजिंठा हस्तकला व शॉपकीपर असोसिएशनचे उपेंद्रपालसिंग वायटी आणि गाईड असोसिएशनचे उमेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरेंचा आज औरंगाबाद दौरा
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज प्रजासत्ताक दिनी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते स्मार्ट सिटीच्या ई गव्हर्नन्स प्रकल्पाचे उद्घाटन करतील तसेच इतरही विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. तसेच खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि खाम इको पार्कचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होत आहे. अजिंठा वेरुळ फर्दापूर येथे पर्यटन विकासाच्या दृष्टीने ते भेट देऊन या स्थळांची पाहणी करणार आहेत.
इतर बातम्या-