maharashtra cabinet meeting : 49 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही माशा मारत होता काय?
संभाजी नगरातील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच विरोधकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं. फडणवीस यांच्या काळातील मराठवाड्याच्या पॅकेजवरून हे टार्गेट करण्यात आलं होतं. त्यावर आता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संभाजीनगर | 16 सप्टेंबर 2023 : राज्य मंत्रिमंडळाची संभाजीनगरात बैठक सुरू झाली आहे. या बैठकीतून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण त्याआधीच विरोधकांनी या बैठकीवर टीका करायला सुरुवात केली आहे. मराठवाड्यासाठी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधीच्या निर्णयाचं काय झालं ते सांगा. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासाठी 49 हजाराचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचं काय झालं? असा सवाल विरोधकांनी केला आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी विरोधकांची अक्षरश: चंपीच केली आहे.
देवेंद्र फडणवीस संभाजीनगरात आल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांचा समाचार घेतला. सर्व निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. एखाद दोन निर्णय अपवाद असेल. या सर्वांची माहिती देणार आहोत. पण अडीच वर्षात मराठवाड्यासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही सरकारमध्ये होते. एखादा निर्णय मागे राहिला असेल तो पूर्ण करण्याची तुमची जबाबदारी होती. तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होता का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
वॉटर ग्रीडचा मुडदा पाडला
तुम्ही मराठवाड्यातील वॉटर ग्रीडचा मुडदा पाडला. ज्यांनी मराठवाडा ग्रीडचा मुडदा पाडला ते त्यावर आज बोलत आहेत. हे कावेबाज लोक आहेत. मंत्रिमंडळाची बैठक हाणून पाडण्याचा यांचा प्रयत्न आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.
आजच्या बैठकीतील निर्णय
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाला भरीव निधी देण्यासाठी चर्चा करण्यात आली. सीड पार्क आणि बियाणे उत्पादनाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठवाड्यातील 600 ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 180 कोटी निधी मंजूर करण्यात आला. जल सिंचन आणि धरण उभारणीसाठी 8 हजार कोटींची निधी देण्याबाबत चर्चाही करण्यात आली.
एक कवडीही दिली नाही
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्याला पॅकेज जाहीर केलं होतं. त्यातील एक कवडीही मराठवाड्याला मिळाली नसल्याची टीका या नेत्यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी आज उत्तर दिलं आहे.