औरंगाबादः महापालिका निवडणूक कधी होईल, अद्याप निश्चित नाही, मात्र शहरातील विकासकामांच्या प्रस्तावाचे पतंग मात्र उंचच उंच भरारी घेत आहे. नागपूर, नाशिकच्या धर्तीवर शहरात शेंद्रा ते वाळूज असा अखंड पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. तर याच प्रस्तावित पुलाबरोबर या दोन ठिकाणांदरम्यान मेट्रो रेल्वेच्या (Metro Railway) प्रकल्पावरही चर्चा सुरु आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी तर शहरात एक नाही तर दोन दोन मेट्रो रेल्वे धावतील, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच शेंद्रा ते वाळूज मार्गावरील मेट्रो रेल्वेसाठी डीपीआर तयार करण्याच्या हालचालीही सुरु केल्या आहेत. हे पाहताच आता शिवसेनेही यात उडी घेतली आहे.
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी शेंद्रा ते वाळूज या प्रस्तावित अखंड उड्डाणपूलाबरोबरच आणखी जागेचे भूसंपादन करून येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरु करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली. रेल्वे मंत्रालयासमोर हा प्रस्ताव ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उड्डाणपूल आणि महामेट्रो यांच्या संयुक्त डीपीआर तयार करण्यासाठी स्मार्ट सिटीमार्फत एका समितीचेही गठन करण्यात येत आहे. या हालचाली पाहिल्यानंतर शिवसेनेने यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे.
माजी खासदार आणि शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी तर आम्हीच शहरात मेट्रोची मागणी पहिल्यांदा केल्याचा दावा केला. 7 फेब्रुवारी 2018 रोजी ही मागणी मी लोकसभेत नियम 377 काळात केली होती. त्यामुळे ही शिवसेनेची मागणी असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात अजिंठा-वेरुळ लेणी, बीबीका मकबरा, शहरातून साईबाबा संस्थान शिर्डी, शनी शिंगणापूर इत्यादीसह प्रमुख धार्मिक स्थळांसाठी पर्यटक येतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी, मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर, पर्यटन केंद्र येथे जाण्या-येण्यासाठी मेट्रो रेल आवळ्यक असल्याचे मी लोकसभेत सांगितले होते. तत्कालीन रेल्वे खात्याने याबाबत सर्वेक्षण करून अर्थसंकल्पात तरतूद केली होती, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
मेट्रोचे श्रेय घेण्यावरून चंद्रकांत खैरेंच्या या प्रतिक्रियेला भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, लोकसभेत चप्चा करणे म्हणजे हा प्रस्तावर मंजूर झाला असे नसते. त्यासाठी तांत्रिक पाठपुरावादेखील महत्त्वाचा असतो. मेट्रोची मागणी पहिल्यांदा मागील आठवड्यात समोर आली. उड्डाणपूल आणि मेट्रो सोबतच झाल्यास कोट्यवधी रुपये वाचतील. म्हणून डीपीआरचे कामही पुढे नेण्यास दोन दिवसांपूर्वी चर्चा केली. मी लोकसभेत अनेक मुद्दे मांडले, चर्चा केली म्हणजे मीच पहिल्यांदा मांडले, असा त्याचा अर्थ होत नाही. खैरैंना या बाबी माहित नसतील तर नाईलाज आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले.
इतर बातम्या-