भागवत कराडांमधला ‘डॉक्टर’ मदतीसाठी तत्पर, विमान प्रवासात प्रोटोकॉल बाजूला ठेवत तातडीची मदत!
विमान प्रवासात असताना अचानक एका प्रवाशाची प्रकृती गंभीर झाली. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता डॉ. भागवत कराड यांनी त्याला मदत केली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री पदावरील माणसाने सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत केलेली ही मदत सध्या कौतुकाचा विषय ठरली आहे.
औरंगाबादः केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) हे फक्त नावालाच डॉक्टर नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मंत्रीपदी विराजमान झाल्यावरही त्यांना डॉक्टरकी पेशाच्या (Doctor Profession) कर्तव्यांची पदोपदी जाणीव असते आणि ही कर्तव्ये ते बजावतातही! म्हणूनच मराठवाड्याच्या सुपुत्रात माणूस, डॉक्टर अजूनही जिवंत आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतात. सोमवारीदेखील याच अनुभवाची प्रचिती आली.
विमानातल्या पेशंटला तातडीची मदत
काल म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी डॉ. भागवत कराड हे इंडिगो फ्लाइटमध्ये बसले होते. त्यावेळी मागील सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक त्रास होऊ लागला. तो प्रवासी कोसळून पडला. विमानात एकाएकी कुजबूज सुरु झाली. ही कुजबूज डॉ. भागवत कराड यांच्या लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता ते सीटवरून उठले. त्या व्यक्तीच्या मदतीला धावले.
मिनिस्ट्री प्रोटोकॉल बाजूला, माणसाचा जीव महत्त्वाचा
सदर प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉ. भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला मदत केली. यावेळी त्यांनी आपण केंद्रीय मंत्री आहोत, जागेवरून असे कसे उठायचे, असे कोणतेही मिनिस्ट्रीचे प्रोटोकॉल विचारात घेतले नाही. एक डॉक्टर म्हणून त्यांनी त्या रुग्णाची सुश्रुषा केली. हे दृश्य विमानातील प्रवासी पाहत होते. गरजवंतांच्या मदतीला धावून आलेल्या या डॉक्टरचे कृत्य पाहून इतर प्रवाशांच्या मनातही त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले.
गरजूचे समाधान हेच मौल्यवान- डॉ. कराड यांची पोस्ट
या अनुभवाबद्दल डॉ. भागवत कराड यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली. अशा प्रकारचे अनेक अनुभव त्यांनी घेतले आहेत. गरजूला मदत करताना मिळणारे समाधान खूप मौल्यवान असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही संतांची शिकवणही कायम लक्षात ठेवा आणि मदतीसाठी पुढाकार घ्या, असा संदेशही डॉ. कराड यांनी दिला.
रस्ते अपघातातील मुलाचे रक्त आपल्या रुमालाने पूसले..
औरंगाबाद शहरातही काही दिवसांपूर्वी रस्त्यावर झालेल्या अपघातात डॉ. कराड यांनी अशीच मदत केली. दुपराच्या वेळी ते एका वाहनातून जात असताना त्यांच्यासमोर एक अपघात झाला. यावेळी एका लहान मुलाला चांगलेच खरचटले होते. त्याच्या तोंडातून रक्त येत होते. डॉ. भागवत कराड यांनी आपली गाडी बाजूला लावली. ते आधी धावत मुलाकडे गेले. आपल्या खिशातील रुमालाने त्याचा चेहरा पुसला. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आणि नंतरच डॉ. भागवत कराड आपल्या प्रवासाला लागले.
डॉ. कराड हे मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन
अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील डॉ. कराड यांनी औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षण घेत ते मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन बनले. शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी 1996 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. आज ते केंद्रीय मंत्रीमंडळात अर्थराज्य मंत्रीपदावर आहेत. मात्र तरीही डॉक्टरकीच्या पेशाचा त्यांना विसर पडलेला नाही, याचा अनुभव लोकांना सदैव येत असतो.
इतर बातम्या-