आता खुशाल करा फराळाचे पदार्थ, खाद्यतेलाचे भाव घसरले, वाचा बाजारातील भाव
औरंगाबादः दिवाळी म्हटलं की खमंग चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे असे पदार्थ डोळ्यासमोर येऊ लागतात. दिवाळीच्या आगमनापूर्वी घरा-घरांतून खमंग फराळाचे गंध दरवळू लागतात. यंदाच्या दिवाळीला तर या पदार्थाचा स्वाद आणखी लज्जतीने चाखता येणार आहे. कारण केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने औरंगाबादच्या बाजारात (Aurangabad Market) पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफुल तेलाचे भाव लीटरमागे 5 ते 10 रुपयांनी […]
औरंगाबादः दिवाळी म्हटलं की खमंग चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे असे पदार्थ डोळ्यासमोर येऊ लागतात. दिवाळीच्या आगमनापूर्वी घरा-घरांतून खमंग फराळाचे गंध दरवळू लागतात. यंदाच्या दिवाळीला तर या पदार्थाचा स्वाद आणखी लज्जतीने चाखता येणार आहे. कारण केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने औरंगाबादच्या बाजारात (Aurangabad Market) पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफुल तेलाचे भाव लीटरमागे 5 ते 10 रुपयांनी उतरले आहेत. येत्या काळात खाद्य तेलाचे (Edible oil ) भाव आणखी उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
31 मार्च 2022 पर्यंत शुल्क कपात
दसऱ्याच्या दोन दिवस आधीच केंद्र सरकारने पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलात 31 मार्च 2022 पर्यंत कस्टम ड्युटी व कृषी उपकरात कपात जाहीर करण्यात आली आहे. कच्च्या पाम तेलावर 7.5 टक्के आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावर 5 टक्के कृषी उपकर लावण्यात येणार आहे. कस्टम ड्युटी कमी होऊन पाम तेल 8.25 टक्के, सोयाबीन तेल 5.5, तर सूर्यफुल तेल 5.5 टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. याचा परिणाम आता औरंगाबाद शहरातील बाजारपेठेवरही दिसू लागला आहे. सोयाबीन तेल 10 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 135 रुपये दराने विकले जात आहे. तर पाम तेल 5 रुपयांनी कमी होऊन 150 रुपयांनी विकले जात आहे. तसेच सूर्यफुलाचे दर प्रतिलीटर 150 रुपये असे आहेत. पुढील काळात हे भाव आणखी घसरतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नव्या शेंगदाण्यामुळे दर घटणार
बाजारात सध्या नव्या शेंगदाण्याची आवक सुरु झाल्याने येत्या आठवड्यात शेंगदाणा तेलात 10 रुपयांनी आणखी घसरण होऊ शकते, असा अंदाज औरंगाबाद शहरातील व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी व्यक्त केला आहे.
काही पॅकिंगच्या तेलांचे भाव अजूनही कमी नाहीत
रिफाइंड करणाऱ्या तेल मिलकडे खाद्यतेलाचा मोठा साठा आहे. दिवाळी लक्षात घेऊन चढ्या किंमतीत साठा करून ठेवला जातो. दरम्यान काही खाद्यतेल रिफाइंड करणाऱ्या मिलने अजूनही पॅकिंगच्या तेलाचे भाव कमी केले नाहीत. सुट्या तेलात भाव कमी होऊ लागले आहेत.
इतर बातम्या-
एकीकडे खुल्या बाजाराचे पाऊल, दुसरीकडे तेलबियांच्या साठा मर्यादेचा निर्णय
Lavender Oil : निरोगी त्वचा आणि केसांसाठी लॅव्हेंडर तेल फायदेशीर!