औरंगाबादः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इतर रखडलेल्या कामांप्रमाणेच औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीलाही विलंब झाला आहे. मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे जिल्हा सहकारी दूध संघात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येथील यंत्रणा आता निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागली असून इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची यापूर्वीची निवडणूक 2015 मध्ये बिनविरोध झाली होती. मात्र यंदा बदललेल्या राजकीय गणितांमुळे ही निवडणूक बिनविरोध होईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. 2015 मध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या सदस्यांची वर्णी लागली होती. तर संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे नंदलाल काळे यांची निवड करण्यात आली होती. या विद्यमान संचालक मंडळलाचा कार्यकाळ 2020 मधील मे महिन्यातच संपुष्टात आला होता. मात्र कोरोना संकटामुळे संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली असून, सध्यादेखील हेच मंडळ अस्तित्वात आहे.
सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे सहकारी संस्थ्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दूध संघाच्या 2021-22 ते 2026-27 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होईल. याकरिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून येथील सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. त्यामुळे सदर कार्यालय निवडणुकीसाठी कामाला लागले आहे.
2007 मध्ये जिल्हा दूध उत्पादक संघाची वार्षिक उलाढाल 80 कोटी रुपयांच्या घरात होती. आता ती 110 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.देवगिरी महानंद या ब्रँडद्वारे औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ बाजारात कार्यरत आहे. सध्या जिल्हा दूध संघाचे सभासद असलेल्या दूध उत्पादक सहकारी संस्थांची संख्या सुमारे 368 असून त्यांच्याकडून प्रारुप यादी तयार करण्यासाठी प्रतिनिधींच्या नावांचा ठराव पारित करून तसा प्रस्ताव 11 ऑक्टोबरपासून मागवण्यात आला आहे. येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत माहिती सादर करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. सादर केलेले ठराव, सभेचे इतिवृत्त आणि संबंधित संस्थांचे मूळ रजिस्टर यांची पडताळणी केली जाईल. छाननीनंतर प्रारुप मतदार यादी तयार होणार असून, त्यानंतर आदेशाप्रमाणे पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.
इतर बातम्या-