औरंगाबादः देवगिरी महानंद या नावाने मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज 11 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील आणि निवडणूकीतील मुख्य लढत कोणा-कोणात होईल, हे चित्र स्पष्ट होईल.
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाची ही निवडणूक 14 संचालक पदांसाठी होत असून यासाठी 346 मतदार आहेत. निवडणुकीसाठी प्रथमच 100 जणांनी अर्ज दाखल केले असून छाननीत 74 अर्ज वैध ठरवण्यात आले होते. कालपर्यंत दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. 11 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील पडद्याआड हालचालींना वेग आला आहे. काही जण बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील असतानाच यंदा नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
औरंगाबाद दूध संघासाठी 22 जानेवारी रोजी मतदान घेतले जाईल. तसेच निवडणुकीचा निकाल 23 जानेवारी रोजी जाहीर होईल. दूध संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे विद्यमान संचालक मंडळाला वाटते. मागील टर्ममध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधित्व संचालक मंडळावर होते, यंदाही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली आहे. मात्र भाजप हा महाविकास आघाडीचा शत्रू आहे. त्यामुळे आघाडी म्हणून आम्ही त्याविरोधात लढलो पाहिजे, आघाडीपैकी कुणी भाजपचा हात धरला तर काँग्रेसला वेगळा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिली.
इतर बातम्या-