स्मार्ट औरंगाबादेत बहरले व्हर्टिकल गार्डन, सिद्धार्थ उद्यानाजवळचा उभा बगीचा ठरतोय आकर्षणाचे केंद्र
व्हर्टिकल गार्डनसाठी साडेसहा हजार झाडांच्या कुंड्या लागल्या आहेत. जवळपास 7 लाख रुपये खर्चून हे गार्डन तयार करण्यात आले आहे.
औरंगाबाद: मुंबई-पुण्याच्या धर्तीवर औरंगाबादमध्येही पहिल्यांदाच व्हर्टिकल गार्डनचा प्रयोग प्रत्यक्षात उतरत आहे. सिद्धार्थ उद्यानाच्या (Siddharh Garden) जवळून वाहणाऱ्या नाल्यावरील पुलाला दोन्ही बाजूनी जाळी लावण्यात आली असूव त्या जाळीवर हा उभा बगीचा आकार घेतल आहे. शहरातल्या या पहिल्याच प्रयोगाची सध्या नागरिकांमध्ये चर्चा आहे.
राष्ट्रीय शुद्ध हवा प्रकल्पाअंतर्गत प्रयोग
सिद्धार्थ उद्यानाच्या जवळून वाहणाऱ्या नाल्यावरील पुलाला दोन्हीही बाजूने जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवर झाडाच्या कुंड्या अडकवून उभे उद्यान (व्हर्टिकल गार्डन) तयार करण्यात आले आहे. याबद्दल महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘महापालिकेला सरकारकडून राष्ट्रीय शुद्ध हवा प्रकल्पांतर्गत वीस लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यातून महापालिका मुख्यालयाच्या चौकातील व वरद गणेश मंदिराच्या चौकातील कारंजे सुरू करण्यात आले आहे. उर्वरित निधीतून सिद्धार्थ उद्यानाजवळील नाल्यावरच्या पुलावर व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले आहे.
6,500 झाडांच्या कुंड्या
या गार्डनसाठी साडेसहा हजार झाडांच्या कुंड्या लागल्या आहेत. पुलाच्या एका बाजूला तीन-सव्वातीन हजार आणि दुसऱ्या बाजूला तीन-सव्वातीन हजार कुंड्या लावण्यात आल्या आहेत. जवळपास 7 लाख रुपये खर्चून हे गार्डन तयार करण्यात आले आहे. नाव्यावर 15 फूट उंच आणि 70 फूट लांब जागेववर हे गार्डन विकसित केले आहे. नाल्यावर जाळी बसवून त्या ठिकाणी पाच प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. या प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर उड्डाणपूल, खुल्या जागांवर व्हर्टिकल गार्डन विकसित केले जाणार आहे सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातून व्हर्टिकल गार्डनसाठी निधी मिळाला, तर शहराच्या अन्य भागातही अशा प्रकारची उद्याने विकसित करता येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्य रस्ते, नाल्यांच्या काठी व्हर्टिकल गार्डन तयार केले तर प्रदुषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, रस्त्यावरील धुळीचे प्रमाण नियंत्रणात येईल.
जागतिक तापमान वाढीसाठी उपाय
जगभरात सध्या तापमानवाढीचा विषय चर्चिला जात आहे. वातावरणातील बदल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हा आता अभ्यासाचा विषय बनू लागला आहे. वातावरणातील बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरण संतुलनाचे विविध प्रयोग केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्हर्टिकल गार्डनची संकल्पना पुढे आली आहे. औरंगाबाद महापालिकेने या कामात पुढाकार घेतला आहे. हा व्हर्टिकल गार्डनचा प्रयोग याचाच एक भाग आहे. यातून पर्यावरणपूरक वातावरण शहरात निर्माण होईल, असे मानले जात आहे.
इतर बातम्या-
Tourist Destination : भारतातील ‘या’ 5 टॉप फॅमिली डेस्टिनेशनला नक्की भेट द्या!