बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या शेतकऱ्याचा ऐन पोळ्याच्या दिवशी बुडून मृ्त्यू, औरंगाबादच्या देवळी गावावर शोककळा
वाळू माफियांनी वाळू उपसण्यासाठी नदी पात्रात मोठ-मोठे खड्डे केले आहेत. अशाच एका खड्ड्यात पाय गेल्याने भास्कर ठोंबरे वाहून गेले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा वाळु उपसा तत्काळ थांबवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
औरंगाबाद: जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील देवळी गावात बैलपोळ्याच्या दिवशीच दुःखद घटना घडली. गावातील शेतकरी पोळ्यानिमित्त सकाळी बैलाला धुण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र अचानक पाय घसरल्याने ते नदीत बुडाले. नदीपात्रातील खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाय घसरला. गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह हाती लागला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवळी गावातील भास्कर अण्णा ठोंबरे (Bhaskar Anna Thombre) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
यासाठी वाळुमाफिया जबाबदार…
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा असा नदीत वाहून मृत्यू होण्यामागे वाळुमाफिया जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. वाळू माफियांनी वाळू उपसण्यासाठी गावातील शिवना नदी पात्रात मोठ-मोठे खड्डे केले आहेत. अशाच एका खड्ड्यात पाय गेल्याने भास्कर ठोंबरे (वय वर्षे 45) वाहून गेले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा वाळु उपसा तत्काळ थांबवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान भास्कर ठोंबरे यांच्या अशा आकस्मिक निधनामुळे संपूर्ण देवळी गावावर शोककळा पसरली आहे.
मक्याच्या शेतात डुकरांचा हैदोस
औरंगाबादमधल्या बिडकीन गावालगतच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून डुकरांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील शेतकरी रडकुंडीला आले आहेत. गावातील शेतकरी रमेश ठाणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन-चार दिवसांपासून गावातील जाधव यांनी पाळलेल्या डुकरांमुळे अनेक शेतांचे नुकसान झाले आहे. रमेश ठाणगे यांच्या मका शेतात तर डुकरांनी खूप नुकसान केले. ठाणगे यांच्या मक्याच्या पिकाला नुकतेच कणसं भरू लागली होती. दिवसभर शेताची राखण केली जाते. मात्र दिवस-रात्र मोकळी फिरत असलेल्या या डुकरांनी रात्रीतून येत मक्याचे नुकसान केले. या डुकरांच्या नुकसानीमुळे जवळपास तीन ते चार क्विंटल मका उत्पादन कमी होईल, अशी व्यथा शेतकऱ्याने व्यक्त केली. यासंबंधीची माहिती सरपंचाला दिल्याचेही ठाणगे यांनी सांगितले.
इतर बातम्या-