औरंगाबादः मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता औरंगाबादमधील महिला पोलिसांच्या कामाचे तासही कमी करण्यात आले आहेत. महिला पोलिसांना आता आठ तासांचीच ड्युटी करावी लागेल. कौटुंबिक आणि कार्यालयीन जबाबदाऱ्यांचा मेळ बसवण्यासाठी राज्यातील महिला पोलिसांच्या ड्युटीचे तास 8 तासच करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. यापूर्वी त्यांना 12 तासांची ड्युटी करणे अनिवार्य होते. सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने यासंबंधीचे आदेश काढले होते. त्याची अंमलबजावणी औरंगाबादेत तीन महिने उशीराने होत आहे. 21 डिसेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी औरंगबादेत होईल, असे आदेश नुकतेच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी कराढले.
महिला पोलिसांना दैनंदिन काम, गंभीर गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात अनेक वेळा ज्यादा तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर परिणाम होतात, असे दिसून आल्याने सर्वप्रथम नागपूर पोलीस आयुक्तालयात आयुक्त अमितेशकुमार यांनी यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यांनी मगिला पोलिसांना आठ तासांच्या ड्युटीचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू केला होता. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी इतर घटकांनीही हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी तर राज्यात सर्वत्र हा नियम लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले. तरीही औरंगाबादेत तीन महिने विलंबाने याची अंमलबजावणी होत आहे.
महिला पोलीसांच्या कामाच्या तापात कपात करण्यात आली असली तरीही महिला पोलीस अधिकाऱ्यांना मात्र पूर्वीच्याच वेळेत काम करावे लागणार आहे. याबाबत महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उलट अधिकाऱ्यांवर कामाचा जास्त ताण असतो. त्यामुळे त्यांच्याही बाबतीत असा निर्णय घेतला जावा, असा सूर उमटत आहे.
दरम्यान, आठ तासांची ड्युटी हा नियम लागू असला तरीही अपवादात्मक स्थितीत, पोलीस बंदोबस्ताची तातडीची गरज निर्माण झाल्यास महिला पोलिसांनाही आठ तासांच्या वर अतिरिक्त वेळ देऊन काम करावे लागेल, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.
इतर बातम्या-