बाथरूमचा बहाणा करून औरंगाबादच्या बालगृहातून पळाली चार मुले, दहा दिवसातील दुसरी घटना
ड्युटीवरील हावळे यांनी मुलांना बाथरुमसाठी सोडले. पण बराच वेळ झाला तरी मुले परतली नाहीत. म्हणून हावळे बाथरुमजवळ गेले. पण तेव्हा तेथे त्यांना मुले दिसलीच नाहीत.
औरंगाबाद: बाथरुमसाठी जायचे असे खोटे सांगून बालगृहातील चार मुले पळून गेल्याची घटना औरंगाबादमधील हडकोतील बालगृहात (Aurangabad balgruh) घडली. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीही याच बालगृहातून सात वर्षांचा मुलगा असाच बहाणा करून पळून गेला होता. त्यानंतर आता एकाच वेळी चार मुले (four children escaped) बाहेर पळाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच बालगृहाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हडकोच्या बालगृहातील प्रकार
शहरातील हडको परिसरातल्या बालगृहात, निरीक्षणगृहात अनाथ, बेपत्ता झाल्यानंतर सापडलेली तसेच विधी संघर्षग्रस्त मुलांना ठेवले जाते. सध्या या बालसुधारगृहात एकूण 3 मुले आहेत. 23 रोजी येथील चार मुलांनी बाथरुमला जायचे, असे सांगून बालगृहातून निसटण्याची योजना आखली. 23 सप्टेंबर रोजी विशाल हावळे हे केअर टेकर म्हणून ड्युटीला होते. संध्याकाळी पाच वाजता एक अनाथ पंधरा वर्षांचा मुलगा, वैजापूर तालुक्यातून आलेला सोळा वर्षांचा मुलगा, गंगापूर तालुक्यातील पंधरा वर्षांचा मुलगा या चौघांनी ही योजना आखली. ‘आम्हाला लघुशंकेसाठी जायचे आहे, ‘ असे हावळे यांना सांगितले. त्यांनी मुलांना बाथरुमकडे सोडले.
बाथरुमला गेलेली मुले तिकडेच पसार झाली
ड्युटीवरील हावळे यांनी मुलांना बाथरुमसाठी सोडले. पण बराच वेळ झाला तरी मुले परतली नाहीत. म्हणून हावळे बाथरुमजवळ गेले. पण तेव्हा तेथे त्यांना मुले दिसलीच नाहीत. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. संस्थेच्या आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध सुरु झाली. डीमार्ट, हडको कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, बाबा पेट्रोलपंप, रेल्वेस्थानक परिसरात शोध घेऊनही मुले सापडली नाहीत. अखेर सिटी चौक पोलिसांत या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दहा दिवसांपूर्वी घडली असाच प्रकार
दहा दिवसांपूर्वीही हडको परिसरातील याच बालगृहातून एक मुलगा हाच बहाणा करून फरार झाला होता. 4 सप्टेंबर रोजी मुस्कान पथकाने पालक नसलेल्या एका सात वर्षाच्या मुलाला बालगृहात आणून सोडले होते. 13 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता लघुशंकेसाठी जातो असे सांगून या मुलानेही बालगृहातून पळ काढला होता. कर्मचाऱ्यांनी मुलाच्या आजीशी संपर्क केला असता, तो तिकडेही आला नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे 13 सप्टेंबर रोजी घडलेल्या या प्रकारानंतर बालगृह प्रशासनाने तब्बल आठ दिवसांनंतर म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी सिटी चौक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे बालगृहाच्या प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
इतर बातम्या