फ्रॉड 30-30 गुतंवणूक योजनेचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे, औरंगाबादमध्ये आरोपींना अंतरिम जामीन मंजूर
औरंगाबाद जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांनीही कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. विशेष म्हणजे, योजनेत अनेकांनी रोखीने पैसे भरल्यामुळे याचे कोणतेही पुरावे शेतकऱ्यांकडे नाहीत. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाल्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
औरंगाबादः जिल्ह्यातील बहुचर्चित 30-30 (Fraud Scheme) आर्थिक घोटाळ्यात पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर या योजनेशी संबंधित अनेकांचे धाबे दणाणले आहेत. शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पाअंतर्गत (Shendra-Bidkin DMIC) जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सरकारकडून मावेजा मिळाला होता. याच शेतकऱ्यांना 30 ते 35 टक्के व्याज मिळेल असे अमिष 30-30 या गुंतवणूक योजनेद्वारे दाखवण्यात आले. यात बिडकीन सह पैठण तालुका आणि औरंगाबाद जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांनीही कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. विशेष म्हणजे, योजनेत अनेकांनी रोखीने पैसे भरल्यामुळे याचे कोणतेही पुरावे शेतकऱ्यांकडे नाहीत. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाल्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
मास्टरमाइंडच्या घराची पोलिसांकडून तपासणी
दरम्यान या सर्व योजनेचा मास्टरमाइंड संतोष राठोड याच्या कन्नड व औरंगाबाद येथील घरांची पोलिसांनी तपासणी केली. संतोष राठोड आणि त्याचा सहाय्यक विजय ढोबळे या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक शीलवंत नांदेडकर यांनी दिली.
दोघांना अंतरिम अटकपूर्व जामीन
या फसवणूक प्रकरणातील सचिन ऊर्फ संतोष राठोड व विजय रामभाऊ घोबडे या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.ए. कुलकर्णी यांनी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक बंधपत्रावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. फिर्यादी ज्योती रघुनाथ धोबडे यांच्या तक्रारीवरून या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या-