Cyber crime: सिमकार्ड बंद पडले म्हणून आला फोन, औरंगाबादच्या महिला वकिलाला 86 हजार रुपयांना गंडवले
बीएसएनएल कंपनीच्या नावाने खोटा कॉल करून महिलेची फसवणूक केल्याची घटना औरंगाबादेत उघडकीस आली आहे.
औरंगाबादः ‘एनी डेस्क’ चा वापर करुन एका महिला वकिलाला सायबर चोरट्यांनी 86 हजार रुपयांचा गंडा (Cyber fraud) घातल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील समर्थनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या हायकोर्टातील वकिलाबाबत फसवणुकीची ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी आला फोन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये हायकोर्टात वकिली करणारे दाम्पत्य राहते. 25 सप्टेंबरला त्यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. तुमचे बीएसएनएलचे सीमकार्ड बंद होणार असल्याचे या मेसेजमध्ये सांगण्यात आले. तसेच सिमकार्ड बंद होऊ नये, यासाठी एका मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी सांगण्यात आले. त्यावर फोन केल्यानंतर सायबर चोरट्यांनी तुम्हाला काही वेळात कॉल येईल, असे सांगितले. त्यानंतर थेट बीएसएनएल कार्यालयातून बोलतो, असे सांगून सिमकार्ड बंद होऊ नये, यासाठी एनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर बीएसएनएल संबंधीचा फॉर्म भरण्यास दिला. त्याचे 10 रुपये भरण्यास सांगितले.
क्रेडिटकार्डची दिली सर्व माहिती
वकील महिलेने चार्जसाठीचे पैसे भरण्यासाठी डेबिट कार्ड नसून क्रेडिट कार्ड असल्याचे सांगितले. तेव्हा सायबर चोरांनी क्रेडिट कार्डचा नंबर मागितला. सीव्हीव्ही नंबर मागितला. त्यावरून ओटीही मिळवला. त्यानंतर मोबाइलवर सतत ओटीपी येत राहिले आणि महिला वकिलाच्या बँक खात्यातून तब्बल 86 हजार 833 रुपये भामट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर हे अधिक तपास करीत आहेत.
इतर बातम्या-