अवघी दुकाने साफ झाली… पण मूर्ती मागणारे हात संपेनात, औरंगाबादेत काल गणेशमूर्तींचा तुटवडा
मागील वर्षीच्या मूर्तींपैकी लहान मूर्तींचा 40 टक्के साठा तसाच शिल्लक राहिला होता. त्यामुळे या वर्षीही मूर्तिकारांनी नवीन मूर्ती कमी तयार केल्या. त्याचा परिणाम उलट दिसून आला.
औरंगाबाद: मागच्या वर्षी कोरोनामुळे बाजारातील गणेश मूर्तींची विक्री खूप कमी प्रमाणात झाली. त्यामुळे यंदा मूर्तीकारांनी मूर्ती तयार करताना आणि दुकानदारांनी विक्रीसाठी मूर्ती आणताना जरा हात आखडताच घेतला. हाच अंदाज नेमका चुकला आणि बाजारात गणेशाची मूर्तींचा तुटवडा (Shortage of Ganesh idol in Aurangabad market) जाणवला. शुक्रवारी औरंगाबादच्या बाजारात गणेशोत्सवानिमित्त (Aurangabad Ganeshotsav) दिवसभर मूर्ती खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली होती. दुपारनंतर तरी गर्दी कमी होईल, असा दुकानदारांचा अंदाज होता, मात्र ती वाढतच गेली. अखेर मूर्तीकारांनीही ही संधी साधत मोजक्याच उरलेल्या मूर्ती दुप्पट-तिप्पट दरात विकल्या. तर काही ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.
दुप्पट-तिप्पट दरात मूर्तींची विक्री
मागच्या वर्षी कोरोनाची साथ ऐन भरात होती. त्यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली. मागील वर्षीच्या मूर्तींपैकी लहान मूर्तींचा 40 टक्के साठा तसाच शिल्लक राहिला होता. त्यामुळे या वर्षीही मूर्तिकारांनी नवीन मूर्ती कमी तयार केल्या. त्याचा परिणाम उलट दिसून आला. या वर्षीच्या गणेशोत्सवात कोरोना साथीचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने गणेश मूर्तींची मागणी केली. मूर्तीकारांकडे मूर्ती कमी आणि मागणारे हात जास्त झाल्याने काल सायंकाळी बाजारात गणेश मूर्तींचा तुटवडा दिसून आला. अखेरीस दुकानदारांनीही दुप्पट-तिप्पट दरात मूर्तींची विक्री केली.
महाग शाडूची मूर्तीही चालेल हो, पण द्या!
जिल्हा परिषद मैदानावर तसेच सेव्हन हिल परिसरात संध्याकाळी अनेक दुकानांवरील मूर्ती संपल्या होत्या. पीओपीच्या मूर्तींची किंमत कमी असल्याने त्या आधीच विकल्या गेल्या होत्या. अशा वेळी महाग असल्या तरी शाडूच्या मातीची मूर्ती का होईना, पण आम्हाला द्या, अशी भूमिका ग्राहकांनी घेतली. तसेच संध्याकाळी मूर्तींचे भाव उतरतील आणि आपल्याला कमी दरात मूर्ती मिळेल अशी आशा लागलेल्या ग्राहकांची निराशा झाली. याउलट त्यांना चढ्या भावाने मूर्तींची खरेदी करावी लागली. काही दुकानदारांनी तर तिप्पट दरात मूर्तींची विक्री केली.
यंदा स्थानिकांच्या 30 टक्के मूर्ती इतरत्र निर्यात
या वर्षी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्तींपैकी 30 टक्के मूर्ती नगरमार्गे सांगली, कोल्हापूर, भागात विक्रीला गेल्या. तर शहरात नगर, पुणे व पेणमधील मूर्ती विक्रीला आल्या होत्या. मागील वर्षी शिल्लक राहिलेल्या मूर्तींमुळे नुकसान झाले होते. ते यंदा भरून निघाले, अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांनी दिली. संध्याकाळी मात्र मूर्तींचा तुटवडा झाल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली होती.
इतर बातम्या-
Aurangabad Gold: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने अजून स्वस्तच, चांदीच्या दरातही घसरण, पहा आजचे भाव
Aurangabad Alert: मिठाई खरेदी करताना सावधान, ट्रेवर Best Before Date लिहिलंय का पहा