अवघ्या 10 मिनिटात कार्यक्रम गुंडाळला, गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात असं काय घडलं?; सर्वच हैराण
लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा नांदेडच्या धर्माबाद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला तरुणांसह महिलांची लक्षणी संख्या होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्तही होता.
नांदेड : सबसे कातील गौतमी पाटील हिची क्रेझ अजूनही ओसरलेली नाही. पावसाळा सुरु झाला तरी गौतमीला कार्यक्रमाच्या ऑफर्स येत आहेत. गौतमीही या ऑफर्स स्वीकारत असून दणक्यात कार्यक्रम करताना दिसत आहे. तिच्या कार्यक्रमाची गर्दीही थोडीही कमी झालेली नाही. तिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत आहे. कार्यक्रमात हुल्लडबाजीही होताना दिसत आहे. त्यामुळे गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येत असतो. नांदेडच्या धर्मादाबादमध्ये गौतमीचा काल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण अवघ्या दहा मिनिटातच गौतमीने आपला कार्यक्रम गुंडाळला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. असं काय घडलं होतं गौतमीच्या कार्यक्रमात? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
नांदेड जिल्हयातील धर्माबाद येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. गौतमीच्या कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्यात आला होता. प्रेक्षकांची तुडूंब गर्दी झाली होती. सुरक्षेसाठी पोलीसही तैनात करण्यात आले होते. मात्र, असं असतानाही गौतमीला अवघ्या 10 मिनिटात कार्यक्रम गुंडाळावा लागला. त्याला प्रेक्षक जबाबदार होते. धर्माबादच्या मोंढा मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गौतमी नेहमीप्रमाणे रात्री 9 वाजता स्टेजवर आली. कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. महिलांची गर्दीही लक्षणीय होती. त्यामुळे संपूर्ण मैदान तुडूंब भरलं होतं. स्टेजसमोर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. हुल्लडबाजांनी आत प्रवेश करू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती.
सौम्य लाठीमार
रात्री 9 वाजता गौतमी स्टेजवर आली. तिने प्रेक्षकांशी थोडा संवाद साधला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. गौतमीने तुम्हा बघून तोल माझा गेला… या पहिल्याच गाण्यावर आपली अदाकारी सुरू केली. गौतमीचा डान्स आणि तिच्या अदा पाहून प्रेक्षकांमधून टाळ्या शिट्ट्या सुरू झाल्या. प्रेक्षकांनी जागेवर उभं राहून डान्स करत जोरजोरात गोंगाट सुरू केला. काही जणांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे या गोंधळी प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमारही केला.
फक्त दीड गाणं गायलं
पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर शांत बसण्याऐवजी प्रेक्षक अधिकच चवताळले. त्यांनी अधिकच गोंधळ सुरू केला. काही प्रेक्षकांनी मैदानातच खुर्च्यांची मोडतोड सुरू केली. त्यामुळे मैदानात पळापळ सुरू झाली. तर काही प्रेक्षकांनी बॅरिकेड्स तोडून स्टेजजवळ गर्दी केली. स्टेजजवळच प्रेक्षकांनी धिंगाणा सुरू केल्याने पोलिसांनी पुन्हा या हुल्लडबाजांवर लाठीमार केला. हा गोंधळ पाहून गौतमीने प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन देखील केले. पण गोधळ थांबत नसल्याने गौतमीने दहा मिनिटात कार्यक्रम बंद केला आणि फक्त दीड गाणं गाऊन ती निघून गेली. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.