Aurangabad: नामांतराचा मुद्दा पुन्हा पेटणार! जिल्हा परिषदेत संभाजीनगर नावाचा प्रस्ताव मंजूर, आता केंद्राच्या मंजूरीची प्रतीक्षा!
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठीचा प्रस्ताव यापूर्वीदेखील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव मंजूरीसाठी गेलेला आहे. सोमवारी 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा या प्रस्तावावर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
औरंगाबादः गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर (Aurangabad- Sambhajinagar) असे नामकरण करण्यासाठी मागणी शिवसेनेतर्फे केली जात आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या (Aurangabad ZP) सर्वसाधारण सभेत सोमवारी 22 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या (BJP) सदस्यांनी हा ठराव मांडला आणि त्याला शिवसेनेच्या पदाधिकारी (Shiv Sena), सदस्यांनी अनुमोदन दिले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टीव्ही सेंटर रस्त्यावरील मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे पार पडली. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
नामांतराचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्राकडे
शहराचे नामांतर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. 2009 साली झालेल्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन सदस्यांनी संभाजीनगर नामांतर करण्याचा ठराव घेतला होता. जुना ठरवा प्रलंबित असताना पुन्हा सर्व सभासदांनी याच विषयावर ठराव मंजूर केला. या सभेत औरंगाबादचे नाव हे संभाजीनगर करावे, असा ठराव भाजपचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर वातुरे यांनी मांडला. यावर उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. यावर शिवसेनेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो केंद्र सरकारने मंजुरीसाठी प्रलंबित आहे.
‘मराठवाड्यात दोन केंद्रीय मंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर करावा’
मराठवाड्याचे दोन केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, असा टोला शिवसेनेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी लगावला. त्यामुळे आता औरंगाबाद की संभाजीनगर नावावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुद्ध सुरू होणार असे दिसते. औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत फेब्रुवारीमध्ये समाप्त होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मार्फत विविध प्रलंबित कामे तसेच निधी नियोजनाच्या विषय सभा संपन्न झाली. त्यात औरंगाबाद की संभाजीनगर याच मुद्द्यावर अधिक चर्चा झाली. त्यामुळे आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिका सोबतच जिल्हा परिषदेमध्ये औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा गाजणार जवळपास स्पष्ट दिसतंय.
इतर बातम्या-