लखलखत्या सोन्याचा कस, कसोटी ते कॅरोटोमीटर, सोने परीक्षणाच्या पद्धती सांगणारा Special Report!
माणसाच्या विशेषतः भारतीय माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारा धातू म्हणजे सोने. जेवढा मौल्यवान तेवढाच फसवणुकीची शक्यताही अधिक. त्यामुळेच त्याच्या शुद्धतेची चाचणी काळानुसार अधिक टोकदार होत गेली. त्याविषयी सविस्तर...
औरंगाबादः जगात सोन्याचं सर्वाधिक वेड भारतीयांनाच (Indian’s love for Gold) आहे. एवढंच नव्हे तर जगातील सर्वाधिक सोनंही भारतीयांच्या अंगावर मिरवलं जातं. मानवी इतिहासात डोकावून पाहिलं तरी सोन्याचं आकर्षण माणसाला कित्येक वर्षांपासून होतं, हे दिसून येतं. त्यातही भारतीय नागरिकांना या धातूचं जास्त वेड. अगदी माणसाच्या (History of Human beings) जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या धातूचं महत्त्व आहे. जन्मलेल्या बाळाला सुवर्णस्पर्श केला जातो, बाळाच्या बारशाला सोन्याचा वाळा केला जातो तर पुढे त्याच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर सोन्याच्या दागिन्याची साथ असते. अगदी मयत माणसासोबतही सोन्याचा तुकडा पाठवण्याची प्रथा आजही आपल्याकडे तंतोतंत पाळली जाते. सोन्यात भारतीयांची सामाजिक, मानसिक, भावनिक, सांस्कृतिक आणि आर्थिक गुंतवणूकदेखील खूप आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक सोन्याची आयात भारतातच होते. प्रत्येक गावातील सराफा गल्लीला प्राचीनकाळच्या सोन्याच्या दागिन्यांचा इतिहास सापडतो. पूर्वीचे सुवर्णकार, त्यांची सोन्याची पारख, साध्या डोळ्यांनी खोटे सोने ओळखणारे तज्ञ आदी असंख्य गोष्टी ज्येष्ठ सराफा व्यापाऱ्यांकडून ऐकायला मिळतात. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते, विविध रासायनिक कसोट्याही घेतल्या जातात. पण पूर्वी केवळ एका दगडावर सोन्याची पारख केली जात होती. हा दगड म्हणजे कसोटी दगड.
कस मोजणारा कसोटी दगड!
सोनं किती शुद्ध आहे, हे पाहण्यासाठी सर्वात पारंपरिक पद्धत म्हणजे सोन्याचा कस मोजणे. हा कस मोजण्यासाठी प्रत्येक सोनाराकडे एक काळा दगड असतो. त्याला कसोटीचा दगड असे म्हणतात. या कसोटीवर सोन्याचा दागिना घासून शुद्धतेची पारख केली जाते. सोने कसोटीवर घासल्यानंतर या काळ्या दगडावर ओरखड्यासारखी रेघ उमटते. त्यावर हायड्रोक्लोरिक आणि नायट्रिक अॅसिडचे मिश्रण लावल्याने रंगात होणारा बदल पाहिला जातो. या ओरखड्यातील सोन्याच्या अंशावरून सोन्याच्या शुद्धतेची पारख केली जाते. त्यातील सोन्याच्या प्रमाणाचा किंवा टक्केवारीचा म्हणजेच कॅरेटचा अंदाज यावरून काढला जात असे. यालाच कसोटीवर कस लावणे असे म्हणत. पूर्वीच्या काळी केवळ साध्या डोळ्यांनी पाहून सोन्याची शुद्धता तपासणारे लोक होते. आता तर कसोटीच्या दगडावरून सोन्याची शुद्धता सांगणारे अस्सल सराफाही अगदी एक टक्क्यावर पोहोचले आहेत, असे औरंगाबादचे प्रसिद्ध सराफा व्यापारी दत्ता सावंत सांगतात.
घरगुती प्रयोगही होतात, पण ते विध्वंसक ठरू शकतात
काही घरगुती पद्धतीनेही सोन्याची शुद्धता तपासता येते. उदाहरणार्थ, एखादी सोन्याची वस्तू व्हिनेगरच्या पाण्यात बुडवून ठेवणे. यात तांबे किंवा जस्त धातूची भेसळ असेल तर व्हिनेगरमधल्या अॅसिटिक अॅसिडसोबत प्रक्रिया होऊन वस्तूला निळसर हिरवा रंग प्राप्त होतो. पण अशा प्रयोगात सोन्याची वस्तू किंवा दागिना खराब होण्याची शक्यता असते. यामुळे आहे त्या दागिन्याला बाधा पोहोचते अर्थात हे डिस्ट्रक्टीव्ह टेस्टिंग मानले जाते.
चुंबकाद्वारे प्राथमिक टेस्टिंग
शुद्ध सोने पाहण्यासाठी चुंबकही महत्वाचे काम बजावते. शुद्ध सोने चुंबकाला चिकटत नाही. मात्र, जरा तरी सोने चुंबकाकडे आकर्षित झाले तर काहीतरी गडबड आहे, असे समजा. सोन्यात भेसळ झाल्याचे ते एक लक्षण आहे. त्यामुळे शुद्ध सोने तात्काल समजते. सोने खरेदी करताना सोबत चुंबक घेऊन जावे.
पाण्याची बेसिक टेस्टही वापरता येते
पाण्याच्या माध्यमातून शुद्ध सोनेबाबत खात्री करु शकता. शुद्ध सोने पाहण्यासाठी एका कपमध्ये पाणी घ्या. त्यात सोने बुडवा. जर सोने कपाच्या तळाशी राहिले तर ते सोने असली आहे. सोने तरंग असेल तर ते नकली आहे, हे सममजा. सोने कधीही तरंग नाही ते पाण्यात बुडते तसेच कधीही जंग पकडत नाही.
कुतूहलासाठी टेस्टिंग किटही मिळतात
सोन्याचे घरगुती टेस्टिंग करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर किंवा बाजारात काही ठिकाणी टेस्टिंग किट्सही मिळू शकतात. या सगळ्या पद्धती केवळ कुतूहल पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यापलिकडे शुद्धतेचे गांभीर्य असेल तर अनेक पारदर्शक पद्धती आहेत.
बीआयएसची हॉलमार्किंग पद्धती
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट,1986 अन्वये बीआयएसची स्थापना झाली. या कायद्यानुसार, बीआयएसला सोन्याचे उत्पादन प्रमाणित करणे आणि प्रमाणिकरणाचा आग्रह धरण्याचा अधिकार प्राप्त झाला. बीआयएसच्या निकषांप्रमाणे सोने आणि सोन्याची उत्पादने प्रमाणित करणं आता अनिवार्य झालं आहे. तरीही सर्वच सोनार किंवा पेढ्या हॉलमार्कचे दागिने बनवत नाहीत. पण हळू हळू सरकारी आग्रह आणि चोखंदळ ग्राहकांची इच्छा या दोन्हीमुळे हॉलमार्क असलेले दागिने सर्वत्र मिळतील.
दागिन्यांवर हॉलमार्क कसे ओळखायचे?
हॉलमार्क असलेल्या प्रत्येक वस्तूवर पाच चिन्हे असतात. 1- बीआयएसचा लोगो 2- कॅरेटचा आकडा (उदा. 22K वगैरे) 3- अॅसे सेंटर म्हणजेच परीक्षण करणाऱ्या संस्थेचे चिन्ह 4- घडणावळीचे वर्ष 5- सोनार किंवा पेढीचा लोगो
कॅरोटोमीटरने होते दागिन्यांचे डिसिक्शन
इंटरनेटद्वारे माहितीचे अफाट विश्व ढवळून काढणारे सामान्य ग्राहकही आता सोने खरेदी करताना प्रचंड चोखंदळ आणि सजग झाले आहेत. कसोटी दगडाच्या रंगावरून सोन्याची शुद्धता कळते तर हॉलमार्किंगवरून त्याचे प्रमाणिकरण होते. मात्र आता कॅरोटमीटर यंत्राद्वारेही आपल्या दागिन्यात इतर कोणते धातू किती प्रमाणात वापरले जातात, याचे पूर्ण डिसिक्शनच होते.
आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त उपकरण
कॅरोटोमीटर हे आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त डिव्हाइस आहे. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी भारतासह जगातील सर्व देश याचा वापर करतात. हे एक नॉन डिस्ट्रक्टिव्ह यंत्र आहे. म्हणजेच यातून निघणाऱ्या किरणांमुळे सोन्याची शुद्धता कळते, पण त्यामुळे दागिन्याला कोणतीही हानी पोहोचत नाही.
कशी आहे कॅरोटोमीटरची प्रणाली?
कॅरोटोमीटर हे एक संगणकीय पद्धतीवर आधारलेले यंत्र आहे. यात क्ष किरणांच्या सहाय्याने सोन्याच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जाते. कॅरेटोमीटरच्या पेटीत दागिना ठेवून त्यावर क्ष किरण सोडले जातात. त्या किरणांचे परावर्तन होते. त्याचे विश्लेषण संगणकीय पद्धतीच्या आधारे केले जाते. क्ष किरणांचे होणारे परावर्तन दागिन्याच्या पृष्ठभागावरील ठराविक जाडीच्या सोन्याच्या गुणवत्तेवर आधारलेले असते.म्हणजेच दागिना न मोडता सोन्याच्या गुणवत्तेबद्दल खात्रीलायक माहिती मिळवण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते, ही माहिती औरंगाबादमधील पीएनजी ज्वेलर्सचे प्रीतम बोरा यांनी दिली.
कॅरोटोमीटर किंमत आणि उपकरणाच्या मर्यादा
सोन्याच्या दागिन्यात जोड देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धातूंचे अचूक विश्लेषण कॅरोटोमीटर करते. त्यामुळे सोन्याचा दागिना वितळवण्यापूर्वी त्याच्या मूल्याचा अंदाज येण्यासाठी कॅरोटोमीटर हे उपकरण प्रत्येक सराफा व्यावसायिकाकडे असणे आवश्यक आहे. मात्र या उपकरणाची किंमत 10 लाख रुपयांच्या घरात असल्याने प्रत्येक व्यापाऱ्याला ते घेणे परवडत नाही. तसेच या उपकरणाच्या काही मर्यादादेखील आहेत. काही यांत्रिक दोष असल्यास या उपकरणातील माहिती चुकीचीही ठरू शकते. तसेच दागिन्यांच्या पृष्ठभागावर ठराविक जाडीपर्यंतच्या पृष्ठभागावरील सोन्याच्या दर्जाचे परीक्षण या पद्धतीत होऊ शकते. म्हणजेच समजा एखादा दागिना हलक्या धातूपासून बनवला आणि त्यावर सोन्याचा जाडसर थर दिला तर या यंत्रात ही फसवणूक उघडकीस येऊ शकत नाही.
दागिना खरेदी करताना काय काय तपासावे?
– दागिना खरेदी करताना ग्राहकांनी तो कॅरोटोमीटरवर तपासण्याची मागणी केली पाहिजे. – खरेदी पावती घेतली पाहिजे. – खरेदी पावतीवर कॅरेट, वजन यांची स्पष्ट नोंद आहे की नाही हे तपासून घ्यावे. – हॉलमार्क हे सरकारने दिलेला अधिकृत ट्रेड मार्क असल्याने नोंदणीकृत सराफाच तो वापरतात. त्यामुळे ग्राहकांनी हॉलमार्किंग दागिन्यांची मागणी करायलाच हवी – प्रत्येक सराफा व्यापाऱ्यांना हॉलमार्किंगची उत्पादने विकणे अनिवार्य आहे, त्यामुळे ग्राहकांनीही हॉलमार्किंगची मागणी केली पाहिजे, जेणेकरून उत्पादनाची विश्वासार्हता अधिक वाढते.
इतर बातम्या-
Nashik Gold: सुखाचे दीप उजळू दे, सोनं-चांदी अजूनही स्वस्तय बरं!