औरंगाबादः जिल्हा दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्या पॅनलचा झेंडा फडकला आहे. यंदाच्या निवडणुकीत अखेरच्या लढतींमुध्ये सर्वपक्षीय पॅनल विरुद्ध अपक्ष अशी चुरस दिसून आली. यात सर्वपक्षीय पॅनलचाच विजय झाला. निकालानंतर झालेल्या सभेत संघाचे अध्यक्षपद हरिभाऊ बागडे यांच्याकडेच राहील, असे राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जाहीर केले. मात्र आपापसात चर्चा केल्यानंतर उपाध्यक्ष कोण होईल, हे ठरवले जाईल, असेही जाहीर करण्यात आले. रविवारी महसूल प्रबोधिनीत या निकालाचा मतमोजणी झाली. यावेळी विजयी सभेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad), काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचीही भाषणे झाली. आता जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
दूध संघाची निवडणूक यंदा बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस या पक्षांचे जिल्ह्यातील नेते एकत्र आले. मात्र सुरुवातीला त्यांना यश येईल की नाही, अशी चिंता होती. कारण 14 पैकी 7 उमेदावारच बिनविरोध निवडून आणण्यात यश आले. उर्वरीत 7 जागांसाठी मतदान घेण्यात आले. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात सर्वपक्षीय पॅनल विरुद्ध अपक्ष असी लढत पहायला मिळाली. शनिवारी सर्वसाधारण मतदारसंघापैकी वैजापूर, फुलंब्री, कन्नड व औरंगाबाद या चार तर महिला राखीव 2 आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 1 अशा एकूण 7 जागांसाठी मतदान झाले.
औरंगाबाद तालुक्यातून हरिभाऊ बागडे यांना 274 मते पडली, कन्नड तालुक्यातून गोकुळसिंग राजपूत यांना 269 मते पडली. फुलंब्री तालुक्यातून संदीप बोरसे यांना 330 मते तर वैजापूर तालुक्यातून कचरू डिके- 286 मते पडली. महिला राखीव मतदारसंघातून शीलाबाई काकासाहेब कोळगे यांना 273 मते पडली. तर अलका रमेश पाटील डोणगावकर यांना 283 मते पडली. भटल्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागासवर्गीय राखीव प्रतिनिधी पुंडलीकराव काजे यांना 250 मते पडली. उर्वरीत सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
या निवडणुकीत सर्वपक्षीय एकता सहकार विकास पॅनलचाच विजय दिसून आला. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निकालानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच विजयी पॅनलचे आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांची भाषणे झाली. राज्यातील सत्तेत परस्परांच्या विरोधात असलेले हे पक्ष स्थानिक पातळीवरील निवडणुकीत मात्र एकत्र दिसून आले. या नेत्यांनी परस्परांवर जमके शेरेबाजी केली. त्यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.
इतर बातम्या–