हर्षवर्धन जाधव म्हणाले, ‘भाजपला ठोकून काढा’, कन्नड शहरात आज कडकडीत बंद, पाहा VIDEO
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव देखील प्रचंड आक्रमक झाले.
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव देखील प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कन्नड शहरात बंदची हाक दिली होती. विशेष म्हणजे त्यांच्या आवाहनाला कन्नड शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज कन्नड शहरातील जवळपास सर्वच दुकानांनी बंद पाडला.
“मी आवाहन करतो उद्या एकही हिंदूने दुकान खोलू नये, संभाजीनगर शहरातील हिंदूंनी दुकानं उघडं ठेवू नये आणि भाजपला ठोकून काढावं, त्यावेळी खरी सलमी होईल. वाट्टेल तसे बोलतील का? बापाची ठेवलीय का?”, असा घणाघात हर्षवर्धन जाधव यांनी केला.
“कोश्यारी काय बोलत आहेत, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी काय बोलत आहेत, सटकून काढा, हिंदुंच्या पोटचे असाल तर उद्या दुकानं बंद ठेवा”, अशा शब्दांत हर्षवर्धन जाधव यांनी आवाहन केलं होतं. यावेळी हर्षवर्धन यांनी भाजपवर सडकून टीका केली.
“भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी म्हणजे जे पक्षाचे धोरण जाहीर करतात अशा माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा माफी मागणारं पत्र लिहिलंय असं विधान केलंय. मी एक गोष्ट सांगतो, संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे केले तरी ते सरेंडर झाले नाहीत. म्हणून आम्ही त्यांना धर्मवीर संभाजी महाराज म्हणतो. छत्रपती संभाजी नगर म्हणतो”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.
“ते एवढं बडबड करत आहेत तरी तुम्ही बोलायला तयार नाहीत. तुम्ही गाड्या घेऊन इकडेतिकडे फिरत आहात. आपण घरात शिवाजी महाराजांचा पुतळा लावतो. फोटो लावतो. आपल्या बापाला शिव्या घालत आहेत, तरी तुम्हाला काही होईना, किती रद्दळ आणि बोगस लोक आहेत”, असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला.