पुढची आमदारकीची निवडणूक लढणार नाही, पण… हरिभाऊ बागडे नेमकं काय म्हणाले
मी म्हणालो की, आता माझं वय 78 वर्षांचं आहे. 2024 च्या निवडणुकीत 80 वर्षांचा राहीन.
औरंगाबाद : आमदारकीच्या निवडणुकीतून निवृत्ती घेतल्याची घोषणा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. त्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघाचे आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. हरिभाऊ बागडे यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. हरिभाऊ बागडे म्हणाले, फुलब्री येथे फराळासाठी मला बोलावण्यात आलं.
त्यावेळी मी म्हणालो की, आता माझं वय 78 वर्षांचं आहे. 2024 च्या निवडणुकीत 80 वर्षांचा राहीन. माझी सालदारकी दोन वर्ष राहील. मी पुन्हा सालदार होणार नाही. त्यावरून लोकांनी म्हटलं की, आता मी पुढं निवडणुकीत उभं राहणार नाही. अनेक कार्यकर्त्यांना मानसिक त्रास झाला. फोन आले. रडले.
पण, मला वाटते की, माझं वय 80 वर्षांचं झाल्यावर मी स्वतःहून सोडलं पाहिजे. शेवटी पार्टीचा अंतिम निर्णय असतो. मी व्यक्तिगत मत जाहीर केलं होतं.
या माझ्या निर्णयामुळं ज्यांना त्रास झाला त्यांना मी माफी मागतो. शेवटी माझ्या राजकीय जीवनाचा निर्णय मी माझ्या पक्षावर सोपवितो. पार्टीसाठी काम केलं. सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार नाही. फक्त आमदारकीची निवडणूक लढणार नाही, असं मी म्हटलं होतं.
हरिभाऊ बागडे म्हणाले, पक्षाचा प्रचार करणार आहे. मी पूर्वी संघाचं काम केलं. त्या काळात व्यायाम भरपूर केला. पत्थ्य पाडतो. व्यायाम करतो. म्हणून प्रकृती चांगलं आहे. शरीराचे लाड करू नका. शरीराकडून भरपूर काम करवून घेतले पाहिजे, असं मला सांगण्यात आलं होतं. शेतीतही कष्ट केलं. शेतीच्या बाहेर केलं. राजकारणातही कष्ट केलं. त्यामुळं आरोग्य चांगलं आहे.
राजकीय क्षेत्रात 1980 साली आलो. प्रमोद महाजन नि मी जालन्याच्या निवडणुकीत एकत्र होतो. मी प्रमोद महाजन यांना म्हटलं राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. संघाची परवानगी घेऊन मला उभं राहण्यास सांगितलं. वसंत राव भागवत संघाचे पदाधिकारी होते. ते म्हणाले होते, तू फक्त संघटनेचं काम. आता भाजपमध्ये आला तर भाजपचं ऐक.
सहा वेळा फुलंब्री मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 1967 सालापासून भाजपचा प्रचार केला. फुलंब्री येथे प्रचाराचं काम केलं. सायकलवर महिनाभर प्रवास केला. सायकलवर पोस्टर राहत होते. दहा-पाच पोस्टर लावायचं. पुढच्या गावात जात होतो.
संघात असताना निवडणुकीपुरता प्रचार करत होतो. मी कायम जनतेत राहतो. लोकांशी संपर्क राहतो. त्यामुळं खर्चाचा फरक पडत नव्हता. मला निवडणूक लढण्यासाठी अधिक खर्च येत नाही. निवडणूक आयोगानं ठरवून दिलेलं असतं तेवढा खर्च असतो.