Aurangabad weather: शहरात सकाळपासूनच रिमझिम पाऊस, आजही सूर्यदर्शन नाही, मुसळधार पावसाची शक्यता
शहर आणि परिसरात आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
औरंगाबाद: शहरात आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. शहरात ठिक-ठिकाणी रस्ते-दुरुस्तीची कामं सुरु आहेत. त्यामुळे सिमेंट, माती, चिखल, गिट्टी आदींमुळे निसरड्या झालेल्या, अर्धवट काम झालेल्या रस्त्यांवरून वाहने चालवताना नागरिकांचे हाल होत आहेत. शहराचे किमान तापमान 21 अंश सेल्सियस ते कमाल तापमान 32 अंश सेल्सियस एवढे राहिल. आज मंगळवारी शहर आणि परिसरात वातावरण ढगाळ असेल. तसेच आजही नागरिकांना सूर्यदर्शन होणार नाही. एकूण पावसाचे व्यापक प्रमाणावर चित्र पाहता, मराठवाड्यातील ग्रामीण (Rain in Marathwada region) भागात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून मराठवाड्यातील बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. मात्र काही भागात मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाल्यामुळे नद्यांना पूर आला तसेच हाता-तोंडाशी आलेली पिके वाहून गेली.
आज आणि उद्याही मुसळधार पावसाची शक्यता
शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरातही आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. शहर आणि परिसरात आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. आज हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड , लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत मात्र परतीच्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.
मराठवाड्यातली महत्त्वाची धरणे भरली
मराठवाड्यातील जायकवाडी, मांजरा, निम्न तेरणाचा अपवाद वगळता निम्न दुधना, विष्णुपुरी, माजलगाव, बिंदुसरा, सिंदफणासह जवळपास सर्वच लहान-मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. सर्वात मोठे धरण असलेले जायकवाडी धरण सध्या 45%, मांजरा नदीवरील धरण 51% तर निम्म तेरणा धरण 61% भरली आहेत. ही धरणे पूर्ण भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाची आवश्यकता आहे.
जालन्यात 4 हजार हेक्टरचे नुकसान
जालना जिल्ह्यात आठवडाभरात तीन वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे 26 मंडळातील पिकांची नासाडी झाली. या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. एकट्या जालना तालुक्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे चार हजार 383 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. गोदावरीच्या पुराचे बॅक वॉटर ओढे-नाल्यांमधून शेतात शिरल्याने घनसावंगी तालुक्यातील रामसगाव शेतशिवाराला तलावाचे स्वरुप आहे. शिवारातील शेकडो एकर क्षेत्रात सध्या पाणी शिरल्याचे चित्र आहे.
इतर बातम्या-
Mumbai Rains Maharashtra Weather : कोकणातील 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात कुठे कुठे पाऊस होणार?