ओ शेठ..तुम्ही मानूस हाय लै ग्रेट!! पेट्रोलचे भाव परवडेनात, घोड्यावरच गाठतो ऑफिस, औरंगाबादचा अवलिया!!
पेट्रोलच्या किंमती वाढल्याने रडत बसण्यापेक्षा किंवा प्रवासाला कात्री लावण्यापेक्षा थोडा वेगळा मार्ग शोधता येतो का असा विचार केला आणि औरंगाबादच्या या अवलियाने थेट घोडाच रस्त्यावर उतरवला. ऑफिस म्हणा की बाजारात, इतर ठिकाणी कामासाठी जायचे असो, हा घोडाच त्याला शहरभर फिरवतो.
औरंगाबादः पेट्रोल डिझेलच्या (Petrol price hike) गगनाला भिडणाऱ्या किंमती पाहून आपला आपला सोयीस्कर मार्ग निवडणारा हा अवलिया. कितीही आंदोलनं, उपोषणं करून किंमती कमी करण्याचा विनवण्या केल्या तरी पेट्रोल-डिझेलचे भाव सरकार काही कमी करेना. मग या अवलियानंही स्वतःचं डोकं चालवलं. आपली दुचाकी घरीच ठेवली आणि लाडक्या ‘जिगर’लाच वाहन बनवलं. आधी हौसेखातर पाळलेल्या घोड्याला (Horse Riding) आता ते कामाच्या ठिकाणी किंवा शहरात कुठेही काम असल्यावर सर्रास त्याचा वाहन म्हणून वापर करतात.
15 किमी अंतरावर नोकरीचे ठिकाण
शेख युसूफ शेख ताजोद्दीन असे हे 50 वर्षांचे अवलिया. घर मिटमिट्यात आणि नोकरी हिमायतबागेजवळ एका महाविद्यालयात. हे अंतर 15 किलोमीटरचे. कॉलेजमध्ये ते लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात. रोज सकाळी कामावर जाण्यासाठी त्यांची ऐटदार स्वारी घोड्यावरच निघते. पूर्वी ते इतरांसारखीच मोटरसायकल वापरत असत. पण पेट्रोलचे दर शंभरीच्या पुढे गेल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. पत्नी, तीन मुले, मुलगी या सगळ्यांचा शिक्षण आणि इतर खर्च त्यांच्याच पगारावर चालतो. त्यामुळे त्यांनी सहा महिन्यांपासून दुचाकी बाजूला ठेवत घोड्यानेच शहरात फिरायचे असे ठरवले.
आधी हौसेखातर पाळला, आता वाहन बनवले!
शेख युसूफ शेख ताजोद्दीन सांगतात, ‘आमच्या घरात आजोबांच्या काळापासूनच घोडा होता. त्यामुळे कुटुंबाला घोडा फार नवीन नाही. सहा महिन्यांपूर्वी पेट्रोलच्या किंमती खूपच वाढल्यामुळे या घोड्याचा वाहन म्हणून वापर का करू नये, असा विचार मनात आला. या विचारानंतर मी एक काठियावाडी घोडा विकत घेतला. हाच आमचा जिगर! आता कामावर जातानाच नव्हे तर शहरात इतर कुठेही कामासाठी जायचे असल्यास मी यावरच फिरतो.
‘जिगर’चा अॅव्हरेज काय?
शेख युसूफ सांगतात, जिगरवर बसून कॉलेजला जाताना सुरुवातीला अनेकजण थट्टा करायचे. पण आता वाटेवरील अनेकजण ओळखीचे झालेत. कॉलेजमध्ये विद्यार्थी मला ‘घोडेवाले मामा’ म्हणतात. माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आमचा जिगर ताशी 40 ते 50 किमी धावतो. त्यामुळे दुचाकीच्या तुलनेत कुठेही पोहोचण्यास फार वेळ लागगत नाही. उलट दुचाकीपेक्षा ही सवारी अधिक आरोग्यदायी वाटते. यामुळे माझे आरोग्यही चांगले राहतेय.
चारा पाणी दिले की निघते सवारी…
या घोड्यासाठी दररोज 50 रुपये खर्च येतो. तेवढ्या खर्चात दिवसभर कुठेही कितीही वेळ फिरता येतते. मोटरसायकलच्या मेंटेनन्सचा खर्च वेगळाच होता. पण घोड्याचे तसे नाही. तो खूप प्रामाणिक आणि शांत स्वभावाचा प्राणी आहे. सकाळ-संध्याकाळ त्याला चारा पाणी दिले की आमची सवारी पक्कीच समजा, असे शेख सांगतात.
इतर बातम्या-