Aurangabad Corona | हॉटेल, रेस्टॉरंट जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर, कोरोना नियम मोडल्यामुळे प्रसिद्ध हॉटेल ‘भोज’ला सील
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने तर कडक पवित्रा धारण केला आहे. येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एका प्रसिद्ध हॉटेलला सील ठोकण्यात आलं आहे. हॉटेल भोज असं या प्रसिद्ध हॉटेलचं नाव आहे.
औरंगाबाद : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली असून राज्य सरकारकडून निर्बंध कडक केले जात आहे. असे असले तरी वेगवेगळ्या आस्थापनांकडून कोरोना प्रतिबंधक नियम पाळले जात नाहीयेत. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने तर कडक पवित्रा धारण केला आहे. येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एका प्रसिद्ध हॉटेलला सील ठोकण्यात आलं आहे. हॉटेल भोज असं या प्रसिद्ध हॉटेलचं नाव आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल, हॉटेलला सील
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील प्रसिद्ध अशा भोज हॉटेलला सील ठोकण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक आढळले होते. येथे क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक भोजन करत होते. तसेच येथे कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडवण्यात आले होते. मास्क न लावता कर्मचारी खाद्यपदार्थ तसेच स्वयंपाक तयार करत होते. या सर्व बाबी समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या हॉटेलला थेट सील टाकण्याचा आदेश दिला. त्यांच्या या आदेशानंतर येथील प्रशासनाने कारवाई केली असून या हॉटेलला सील ठोकण्यात आले आहे. या निर्णयानंतर कोरोनाचा संसर्ग पाहता रेस्टॉरंट आणि हॉटेल जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर आल्याचे म्हटले जात आहे.
संकटासाठी महापालिकेची तयारी काय?
– महापालिकेने 750 ऑक्सिजन बेड तयार केले आहेत. – दुसऱ्या लाटेत 7 ते 8 हजार रुग्णांवर एकाच वेळी उपचार केले जातील, एवढी महापालिकेची क्षमता होती. आता ही क्षमता 10 हजार रुग्णांपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. – त्यामुळे किलेअर्क, एमआयटी कॉलेजची दोन वसतीगृहे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह, देवगिरी महाविद्यालयाचे वसतीगृह, आयएचएम कॉलेजचे वसतीगृह या पाच ठिकाणी सोमवारपासून कोविड सेंटर्स सुरु केले जातील.
इतर बातम्या :