Raj Thackeray : महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही; राज ठाकरे यांचं मोठं विधान
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भाजपकडून वारंवार तारखा दिल्या जात आहेत. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तर मार्चमध्येच ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे.
औरंगाबाद: राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भाजपकडून वारंवार तारखा दिल्या जात आहेत. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तर मार्चमध्येच ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे. परंतु, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही, असं विधान केलं आहे.
राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ठाकरे सरकार पडणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर तिघांचं सरकार पाहता हे सरकार पडेल असं वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच महाविकास आघाडीचे घोटाळे मी काढणार नाही, असंही राज यांनी सांगितलं.
पाच लाख उद्योजक देश सोडून गेले
पाच लाख उद्योजक देश सोडून गेल्याच्या बातमीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाच लाख व्यावसायिक जेव्हा देश सोडतात त्यावेळी नोकऱ्यांवर काय परिणाम होतो याची आपण चर्चा करत नाही. आर्यन खानची बातमी आपण 28 दिवस चालवतो, सुशांत सिंह प्रकरण, अँटालिया प्रकरण आपण लावून धरतात. पण हे पाच लाख उद्योजक कुठे गेले याचा आपल्याला शोध घ्यावा वाटत नाही. सर्व गोष्टींची अनिश्चितता असताना आपण कोणतेही विषय फिरवतो, असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रश्न
निवडणुका या येतच राहतात. म्हणून निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणून शकत नाही. संभाजी नगरची निवडणूक वर्षभर पुढे जाण्याची शक्यता आहे. इतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, पण त्याचीही खात्री देता येत नाही. त्याही निवडणुका सहा आठ महिने पुढे जातील, असं चित्रं आहेत. त्यासाठी ओबीसीचे प्रकरण सुरू केलंय. केंद्राने मोजायचे की राज्याने मोजायचे यावरून मोजामोजी सुरू झाली आहे. कोणी सामोरे जायला तयार नाही. आमच्याकडे मते मागायला येऊ नका, अशा पाट्या ओबीसींनी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ओबीसींना सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.
वाझेंनी अँटालियाच्या खाली गाडी का ठेवली?
सचिन वाझे हा शिवसेनेचा माणूस आहे. मुकेश अंबानी हे उद्धव ठाकरेंचे मित्रं आहेत. मग वाझेंनी अँटालियाच्या खाली गाडी का ठेवली? हा एवढा साधासोपा प्रश्न आहे, असं सांगतानाच अँटालिया खाली गाडी ठेवली यावर फोकस न राहता, हे प्रकरण दुसऱ्याच मुद्द्यावर भरकटत जाईल, हे मी आधीच सांगितलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
VIDEO : टॉप 9 न्यूज |14 December 2021#FastNews pic.twitter.com/kTNjjeLW43
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2021
संबंधित बातम्या:
Nashik| नाशिकमध्ये बिल्डर कोल्हेला बेड्या; आधी मोक्का आता फसवणुकीचा गुन्हा, नेमकं काय प्रकरण…?