Raj Thackeray : नवनीत राणाच्याविरोधात राजद्रोहाचा आरोप मग राज ठाकरेंच्याविरोधात का नाही? जलील यांचा सरकारला सवाल
Raj Thackeray: आम्हाला तिरंगा रॅली काढायची होती. पण पोलिसांनी आम्हाला मनाई केली.
औरंगाबाद: चिथावणीखोर भाषण केलं म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, राज ठाकरेंवर जे गुन्हे दाखल केले आहेत, त्याला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी विरोध केला आहे. मी खासदार नवनीत राणांचं (navneet rana) समर्थन करत नाही. पण नवनीत राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो तर मग राज ठाकरेंवर तोच गुन्हा दाखल का होऊ शकत नाही. तीन दिवस भाषण तपासल्यानंतर पोलिसांनी थातूरमातूर गुन्हे का दाखल केले? थेट बोळा कोंबा, आवाज बंद करा आणि होऊन जाऊ द्या एकदाचं अशी भाषा राज ठाकरे यांनी वापरली. ही भाषा चिथावणीखोर नाही का? असा सवाल करतानाच केवळ आपला भाऊ आहे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही का? असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे.
नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला तुरुंगात टाकलं आहे. त्यात काय वेगळं आहे हे आम्हाला सरकार आणि पोलीस प्रशासनाने समजून साांगावं. नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायला येणार होत्या हा देशद्रोह आणि हजारो लोकांसमोर जाती धर्मात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणं, लोकांना दंगल करण्यास प्रवृत्त करणं आणि देशाला कमजोर करण्याचे प्रयत्न करणं हा देशद्रोह नाही का? दोन्ही प्रकरणात वेगवेगळी सेक्शन का लावली? पोलिसांना विनंती आहे की, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. मुस्लिम समुदायांना विनंती आहे की, तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवा. त्यांना वेळ द्या, असं इम्तियाज जलील म्हणाले.
खोदा पहाड आणि निकला चुहा
तीन दिवस भाषण झाल्यावर सखोल चौकशी केली. संशोधन केलं, असं पोलीस म्हणतात. पण राज यांच्याविरोधात जी कलम लावली आहेत. त्यातून मग खोदा पहाड आणि निकला चुहा, असं दिसतंय. तुम्ही कंडिशन्स दिली होती ती पार पडली नाही. भोंग्याचे डेसिबल आणि लोकांच्या गर्दीची कलमे लावली. ही सर्व सेक्शन्स जामीनपात्रं आहेत. पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असं त्यांनी सांगितलं.
भाऊ म्हणून राजद्रोहाचा गुन्हा नाही का?
आम्हाला तिरंगा रॅली काढायची होती. पण पोलिसांनी आम्हाला मनाई केली. रूट चेंज करायला सांगितलं. त्यामुळे आम्ही बेत रद्द केला. आम्हाला जे सांगितलं तेच राज ठाकरेंना का सांगितलं नाही? का नाही केलं? त्यांचा दबाव होता का? माझा भाऊ आहे. त्याच्यावर कशाला देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू? असं मुख्यमंत्र्यांना वाटतं का? असे सवाल करतानाच सर्व राजकीय पक्षांची मिटिंग झाली. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावाही त्यांनी केला.