Aurangabad: दानवेंनी फडक्यात बांधून आणला भाकरी अन् ठेचा, औरंगाबादेत भाजपचे गावागावांत डबा पार्टीचे आयोजन!
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील घरून बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा, गाजर, काकडी सोबत आणली होती. विशेष म्हणजे दानवें भाकरी फडक्यात बांधून आणल्या होत्या. हे पाहून उपस्थित कार्यकर्ते आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते.
औरंगाबादः आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तर आता भाजपच्या वतीने औरंगाबादच्या ग्रामीण भागात डबा पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. युवा मोर्चा, युवा संवाद व डबा पार्टी असे भाजपच्या नव्या मोहिमेचे नाव आहे. कन्नड-सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी घेतला. तसेच औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथेही अशा डबा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या डबा पार्टीला कार्यकर्त्यांनी आपापल्या घरून डबा आणण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री दानवे यांनीही आपल्या घरून भाकरी आणि ठेचा आणला. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या या डबा पार्टीची मोठी चर्चा रंगली आहे.
कार्यकर्त्यांसाठी डबापार्टीचे आयोजन
कन्नड व सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे भाजपच्या वतीने नुकतीच युवा कार्यकर्त्यांसाठी संवाद व डबा पार्टीचे आयोजन करण्यात आले. गाव पातळीवर पक्ष संघटन वाढीसाठी कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत रावसाहेब दानवे यांनी कन्नड-सोयगाव तालुक्यात भाजपला नेतृत्व देण्यासाठी कार्यकर्त्यांनीच पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथेही या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दानवे यांनी जमिनीवर बसून जेवण करताना कार्यकर्त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी एकजुटीचे व विजयाचे धडे दिले.
दानवेंनी फडक्यात बांधून आणली भाकरी
औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथील जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चांगुलपाये यांच्या मळ्यात भाजप युवा मोर्चा कार्यकर्ता मेळाव्यासह डबा पार्टीचे आयोजन करण्यात आले. या डबापार्टीसाठी मंत्री दानवे यांच्यासह उपस्थित प्रत्येकाने डब्बा आणला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील घरून बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा, गाजर, काकडी सोबत आणली होती. विशेष म्हणजे दानवें भाकरी फडक्यात बांधून आणल्या होत्या. हे पाहून उपस्थित कार्यकर्ते आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. तालुक्यातील प्रत्येकाने या मेळाव्याला येताना घरूनच डबा आणल्याने या बैठकीची सर्वत्र चर्चा रंगली.
प्रत्येक तालुक्यात बैठकांचे आयोजन
भाजपच्या वतीने आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात अशा बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात मंत्री दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावातील प्रत्येक जातीधर्मातील तरुणांना एकत्र करून पक्षाचे कार्य वाढीच्या सूचना केल्या. तसेच सर्वच गटात व गणात भाजपचे उमेदवार विजयी करण्याचा निश्चय करण्यात आला. या बैठकीला आमदार हरिभाऊ बागडे, सजनराव मते, सजन बागल, भाऊराव मुळे, अशोक पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर बातम्या-