स्मार्ट सिटी औरंगाबादेत व्यावसायिक नळांना मीटर, पाच इलेक्ट्रिक कार, वाचा बैठकीतील ठळक मुद्दे
स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक मंगळवारी शहरात पार पडली. यावेळी शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या वेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, शहर अभियंता सखाराम पानझडे आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद: स्मार्ट सिटी अभियानासाठी 81 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याअंतर्गत मनपासाठी पाच इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या जातील. तसेच शहरातील व्यावसायिक नळांसाठी आता औरंगाबाद महापालिकेतर्फे (Aurangabad Municipal corporation) लवकरच मीटर बसवण्यात येणार आहे. शहरातील जवळपास पाच हजार व्यावसायिक वापरातील नळांवर हे मीटर लावण्यात येतील. यासंबंधीची निविदा लवकरच जारी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक मंगळवारी शहरात पार पडली. यावेळी शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. स्मार्ट सिटी संचालक मंडळाची हॉटेल ताजमध्ये बैठक झाली. या वेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, शहर अभियंता सखाराम पानझडे आदींची उपस्थिती होती. या बैठकीत व्यावसायिक वापरातील नळांना मीटर लावण्यासह इतरही मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-
– मनपासाठी पाच इलेक्ट्रिक कारः पाच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत झाला.
– व्यावसायिक नळांना मीटरः शहरातील जवळपास सर्व व्यावसायिक नळांना मीटर बसवण्यास मंजुरी मिळाल्यामुळे निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. पाच हजार नळांना मीटर बसवले जाणार असून, निविदेची किंमत 13 कोटी 16 लाख रुपये आहे. स्मार्ट सिटीचे मेंटॉर बलदेवसिंग यांनी या योजनेला मंजुरी दिली.
– स्मार्ट सिग्नलः मुंबईच्या धर्तीवर शहरात स्मार्ट सिग्नल बसवण्याचा निर्णय पांडेय यांनी घेतला होता. त्यानुसार हायकोर्टाजवळ एक सिग्नल बसवले. आता नगर नाका ते केंब्रिज, सिडको ते हर्सूल, रेल्वेस्टेशन ते हर्सूल या रस्त्यावर 79 लाख रुपये खर्चून 25 ठिकाणी स्मार्ट सिग्नल बसवले जातील.
– स्मार्ट रोड, स्मार्ट स्कूल, स्मार्ट हेल्थ सेंटरः महापालिकेसाठी स्मार्ट रोड, स्मार्ट स्कूल, स्मार्ट हेल्थ सेंटर हे प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यावर सुमारे 300 कोटी रुपये खर्च केले जातील. स्मार्ट सिटीत मनपाचा 250 कोटींचा हिस्सा असून, यातून ही कामे करण्याचा संकल्प आहे. या प्रकल्पातून नागरिकांना प्रत्यक्षात काय फायदा होणार? याचे सादरीकरण करण्याच्या सूचना सिंग यांनी केल्या.
– एकनाथ रंगमंदिरातील प्रकाश योजनाः संत एकनाथ रंगमंदिराच्या प्रकाश योजनेचे काम 90 लाख रुपये खर्च करून स्मार्ट सिटीतून करण्यात आले. यास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.
– ऑरिक सिटीसाठी डिस्प्लेः स्मार्ट बसच्या स्वच्छतेसाठी निविदा अंतिम करण्यास, शहरात लावण्यात आलेल्या डिस्प्लेवर जाहिराती देण्यास मंजुरी देण्यात आली. 10 डिस्प्ले बोर्ड हे ऑरिक सिटीसाठी दिले जातील.
पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक कशी?
मंगळवारी झालेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीचीमाहिती अनेकांना नव्हती. दरवेळी या बैठका डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातील सभागृहात घेतल्या जातात. या वेळी पंचतारांकित हॉटेलमध्ये घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इतर बातम्या-