औरंगाबादः भीमनगरजवळील श्रावस्ती बुद्धविहार परिसरात उभारलेल्या धम्ममिशन पॅगोड्याचा (Pagoda) ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडला. मंगळवारी दुपारी राज्यभरातून आलेल्या भिक्खूंनी या मंगलमय सोहळ्याचा आनंद लुटला. बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक भदन्त धम्मसेवक महास्थवीर यांच्या हस्ते शिखरावर सोन्याचा छत्रीकळस ठेवून धम्ममिशन पॅगोड्याचा उद्घाटन सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
औरंगाबादेत मंगळवारी धम्ममिशन पॅगोड्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर तथागत बुद्धांनी वापरलेला अष्टपरिस्कार (आठ वस्तू) बांग्लादेशाचे भदन्त धम्मरत्न महाथेरो व भदन्त बोधिपालो महाथेरो यांच्या हस्ते पॅगोड्यात ठेवण्यात आला. तीन रत्नांचे गुणवर्णन केलेला सोन्याचा ताम्रपट श्रीलंकेचे भदन्त सुगतवंश महाथेरो यांच्या हस्ते ठेवण्यात आला. तसेच सोन्याची सुई-दोरा आणि इतर काही वस्तू भदन्त ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या हस्ते ठेवण्यात आले. ब्रह्मदेशाचे भदन्त आयुपाला महाथेरो आणि भदन्त विनयरक्षिता महाथेरो यांच्या हस्ते सोन्याच्या डबीत ठेवलेला बोधिवृक्षाच्या फांदीचा तुकडा, शहर व परिसरातील भिक्खू संघाची नावे कोरलेला ताम्रपट नेपाळचे भदन्स डॉ. इंदवस व बांग्लादेशाचे भंते बोधिमित्र महाथेरो यांच्या हस्ते ठेवण्यात आला.
हा छत्रीकळस चढवण्यासाठी मोठ्या क्रेनमध्ये भदन्त धम्मसेवक महास्थवीर बसले. हळू हळू क्रेन शिखरापर्यंत पोहोचत होते तेव्हा पुष्पवृष्टीत छत्रीकळस ठेवला. धम्ममय भारत मिशनचे प्रमुख भंते ज्ञानरक्षित थेरो यांच्या पुढाकाराने धम्ममिशन पॅगोडा उभारण्यात आला आहे. या पॅगोड्यात तथागत गौतम बुद्धांची भव्य मूर्ती असून राज्यभरातील उपासकांनी दान केलेल्या 40 तोळे सोन्याचा छत्रीकळस तयार करण्यात आला आहे. या कळसाला बोधिवृक्षाची 35 पाने झुंबरासारखी लटकवलेली असून पॅगोड्याकडे यामुळेच सर्वांचे लक्ष वेधले जाते.
इतर बातम्या-