औरंगाबादच्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची बांग्लादेशवर विजयी सलामी, आज दुसरा सामना

| Updated on: Oct 27, 2021 | 2:34 PM

27 ऑक्टोबर रोजी मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी या मालिकेतील अंतिम सामना असून 30 ऑक्टोबरला बांग्लादेश क्रिकेटची टीम औरंगाबादहून रवाना होईल.

औरंगाबादच्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची बांग्लादेशवर विजयी सलामी, आज दुसरा सामना
भारत-बांग्लादेश दिव्यांग क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात भारताचा विजय
Follow us on

औरंगाबादः शहरातील एमजीएम क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या भारत-बांग्लादेश (India-Bangladesh) दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाने (Cricket Team) बांग्लादेशवर विजय मिळवला. बोर्ड ऑफ डिसेबल क्रिकेट असोसिएशनतर्फे ही दिव्यांग आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी या स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात बांग्लादेशला 43 धावांनी पराभूत केले. यासह तीन लढतींच्या या मालिकेत भारतीय संघाने 1-0 ने आघाडी गेतली.

फेरोज आणि अभिषेकची जादू

या पहिल्या सामन्यात फेरोज अहमद गनीने 112 धावा आणि 1 बळी घेत अष्टपैलू कामगिरी दाखवली. तर अभिषेक शुक्लाने भेदक गोलंदाजी दाखवत 6 बळी घेतले. काल प्रथम फलंदाजी करताना भारतीय दिव्यांग संघाने 7 बाद 272 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर दीपक जावळेने 16 आणि पी.अलीने 21 धावा करत 31 धावांची सलामी दिली. कर्णधार ज्योतिराम घुले अवघ्या 9 धावांवर परतला. फेरोज अहमद गनीने शानदार शतक झळकवत 112 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 102 चेंडूंचा सामना करत 15 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार मारले.
राजने 14 आणि ए. शिवकोटीने 14 धावा जोडल्या. जगजित मोहंतीने 43 चेंडूंत 45 धावा जोडल्या. त्याने 4 चौकार व 2 षटकार लगावले. फेरोज व जगजितने 107 धावांची भागीदारी करत संघाला 250 धावांचा टप्पा गाठून दिला. बांगलादेशने तब्बल 9 गोलंदाजांचा वापर केला. मात्र, संघ भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखू शकला नाही. मो. अलोम खानने 42 धावांत 3 व मुनीर 2 गडी बाद केले.

बांग्लादेश सुरुवातीलाच ढेपाळला

भारतीय संघाने शुक्लाच्या धारदार गोलंदाजीतून अवघ्या 36.5 षटकांत एकतर्फी विजय मिळवला. 272 धावांच्या प्रत्युत्तरात बांग्लादेश संघ 229 धावांवर ढेपाळला.
बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सरवर (0) व रिहार (6) आल्या पावली तंबूत परतले. मोनीरुज्जुमन 31 व रायदुलने 31 धावा केल्या. अष्टपैलू अलोम खानने 87 चेंडूंत 14 चौकार 2 षटकारांसह 104 धावा काढल्या. विबेन दासने 20 व अहसानुल्लाहने 11 धावा केल्या. भारताच्या अभिषेक शुक्लाने 40 धावा देत 6 फलंदाज तंबूत पाठवले. अष्टपैलू फेरोजने एक बळी घेतला.

29 ऑक्टोबरला अंतिम सामना

दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश टीमच्या दुसऱ्या सामन्यात क्रिकेटपटू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वन डे मालिकेसाठी बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट पटूंची टीम सोमवारीच औरंगाबादेत दाखल झाली आहे. बांग्लादेशाच्या चमूत एकूण 24 जण असून त्यांची व्यवस्था हर्सूल परिसरातील क्लीक हॉटेल येथे करण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर रोजी या मालिकेतील अंतिम सामना असून 30 ऑक्टोबरला बांग्लादेश क्रिकेटची टीम औरंगाबादहून रवाना होईल.

इतर बातम्या-

India vs Pakistan: शमीवर टीकांच्या वर्षावानंतर अवघं क्रिकेट जगत एकवटलं, शमीच्या समर्थनार्थ अनेकांचे ट्विट

2 नव्या IPL संघांची किंमत ऐकून शेन वॉर्न म्हणतो मानलं बुवा! क्रिकेट जगातला दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ का आहे?