आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेचं आयोजन, लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडा पातळीवर स्पर्धा
लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ही स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आठवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थी गटासाठी ही स्पर्धा असेल.
उदगीर: स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती एकत्र असल्याने दरवर्षी शालेय, जिल्हा पातळीवर विविध स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून शाळांमधील अशा स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. यंदाही 2 ऑक्टोबर या लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने मराठवाडा पातळीवर वाद-विवाद स्पर्धेचे (Online debate competition) आयोजन करण्यात आले आहे. उदगीर येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयामार्फत (Lal Bahadur Shastri secondary school, Udgir) दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा स्पर्धेचे हे 42 वे वर्ष आहे.
वाद-विवाद स्पर्धेचा विषय
मराठवाडा पातळीवर आयोजित या वाद-विवाद स्पर्धेसाठी “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारत विकासाकडे वाटचाल करतो आहे/नाही” हा विषय देण्यात आला आहे. या विषयावरील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूची मतं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मांडता येतील.
65000 रूपयांची पारितोषिकं
लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ही स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आठवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थी गटासाठी ही स्पर्धा असेल. या स्पर्धेत शाळेतील एका स्पर्धकाने विषयाच्या अनुकूल बाजूने व दुसऱ्या स्पर्धकाने विषयाच्या प्रतिकूल बाजूने विषय मांडणी करणे बंधनकारक आहे. या स्पर्धेत तब्बल 65000 रूपयांची पारितोषिके विविध गटातून दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठीचा संपर्क क्रमांक
मराठवाडा स्तरावरील या वाद-विवाद स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय संघांनी सहभागी होण्याचे आवाहन उदगीर येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 9503768694, 9404863429 या संपर्कक्रमांकावर आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, स्पर्धा प्रमुख एकनाथ राऊत व स्पर्धा सहप्रमुख स्मिता मेहकरकर यांनी केले आहे.
इतर बातम्या-
3 किलोमीटर अॅथलिस्ट स्पर्धेत गोंदियाचा परीमोल देशात दुसरा, असंख्य अडचणींवर मात करत दैदिप्यमान यश