एक चूक थेट जीवावर बेतली, कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ क्रॉस करणारी तरुणी जीवानिशी गेली, जळगावात काय घडलं?
शिवाजी नगर परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह जिलहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला.
जळगावः रस्त्यावरून चालतानाचा वेळ कामी यावा म्हणून अनेकजण कानात हेडफोन घालून चालत असतात. हे करताना आपल्याला आजू-बाजूच्या वाहनांचा आवाज ऐकू येणं कठीण जातं . ही क्षुल्लक घटना आपल्या जीवावरही बेतू शकते. जळगावात (Jalgaon) असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. कामावरून घरी जाणाऱ्या तरुणीने कानात हेडफोन (Headphone) घातले होते. अशाच स्थितीत ती रेल्वे रूळ क्रॉस (Crossing) करू लागली. कदाचित तिला रेल्वेचा आवाज ऐकू आला नसेल. सुसाट वेगाने येणाऱ्या रेल्वेचा जबरदस्त धक्का तरुणीला बसला. या धक्कानं तरुणी दूर अंतरावर फेकली गेली. गंभीर जखमी झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. जळगावात शिवाजी नगर भागात ही भयंकर घटना घडली. या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणी कोण?
सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, स्नेहल वैभव उज्जैनकर (वय-19, रा. धनाजी काळे नगर, जळगाव ) असे मयत तरुणीचं नाव आहे.. स्नेहल उज्जैनकर ही आई-वडिलांसह शिवाजी नगर परिसरातील धनाजी काळे नगरात वास्तव्याला होती. ती शहरातील एका कॉसमॅटीक दुकानावर नोकरीला होती . नेहमीप्रमाणे 23 मे रोजी रात्री स्नेहल कामावरून घरी पायी निघाली. स्नेहलने तिच्या कानात हेडफोन लावलेला होता. जळगाव तहसील कार्यालयाजवळून शिवाजी नगरात जाण्यासाठी रेल्वेरूळ क्रॉस करत असतांना भुसावळकडून जळगावकडे येणारी धावत्या सुरत पॅसेंजर गाडीचा जोराचा धक्का लागल्याने स्नेहल जागीच ठार झाली.
अकस्मात मृत्यूची नोंद
शिवाजी नगर परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह जिलहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा प्राथमिक तपास लोहमार्ग पोलीस कर्मचारी सचिनकुमार भावसार आणि किशोर पाटील करीत आहेत.