सदानंदाचा उदो उदो.. लाखो गरीबांचा कैवारी खंडेराया का झाला एवढा लोकप्रिय? चंपाषष्ठीच्या निमित्ताने वाचा Special Report
महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेलेल्या खंडोबाच्या यात्रेची आज चंपाषष्ठीच्या निमित्ताने सांगता होत आहे. यळकोट यळकोट.. जय मल्हारच्या जयघोषात भाविक हळदीचा भंडारा उधळत खंडोबाचं दर्शन घेत आहेत. सर्व जातीधर्मात खंडेराया एवढा लोकप्रिय का झाला, याची कारणे शोधणारा स्पेशल रिपोर्ट...
औरंगाबादः बोल खंडोराव महाराज की जय.. सदानंदाचा उदो उदो.. असे म्हणत आज चंपाषष्ठीच्या (Champashashthi) निमित्ताने हजारो, लाखो भाविक खंडोबाचं दर्शन घेतायत. हळद-रेवड्या उधळून राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये खंडेरायाचा (Khandoba) जयघोष सुरु आहे. गरीबातला गरीब माणूस जे साधं अन्न खातो त्या भरीत-भाकरीचा नैवेद्य या दीनांच्या कैवाऱ्याला दाखवला जातो. गरीबांची देवता अशी ख्याती खंडोबा देवतेची आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील हे लोकप्रिय हिंदू दैवत. महाराष्ट्रात तर अनेक भाविकांचे ते कुलदैवत आहे. विशेष म्हणजे शंकराचा अवतार मानला जाणारा हा खंडोबा ठराविक जातीत लोकप्रिय नसून अठरापगड जातीतील लोक त्याला मानतात. का झाला खंडोबा एवढा लोकप्रिय, चला पाहुयात…
अठरापगड जातींना का लोकप्रिय वाटते?
खंडोबा हा अठरापगड जातींचा, बहुजनांची देवता आहे. या समाजाच्या खिशाला देवतेचे पूजन करण्यासाठी फार झळ पोहोचू नये म्हणून घरात उपलब्ध असते, तेच देवालाही प्रिय आहे, अशी मान्यता आहे. चंपाषष्ठीचा उत्सव हिवाळ्यात येतो. या काळात थंडी वाढलेली असते. त्यामुळे उष्ण प्रवृत्तीची बाजरीची भाकरी (रोठ), वांग्याचे भरीत, लसूण, कांदा, खोबरे, रेवडीचा नैवेद्य दाखवून खंडोबाची तळी उचलली जाते. भंडारा म्हणजेच हळद उधळून निर्माण होणाऱ्या पिवळ्या रंगाने खंडोबाची मंदिरं जणू सोन्याचीच होऊन जातात. म्हणून सोन्याची जेजूरी असं म्हटलं जातं.
चंपाषष्ठीच्या उत्सवाचं महत्त्व काय?
हिंदू धर्मात आषाढी एकादशी ते चंपाषष्ठी हा व्रतवैकल्ये, धार्मिक अनुष्ठान आणि सणवाराचा काळ आहे. काही भाविकांनी श्रावण महिन्यापासून कांदा, लसूण, वांगी सेवन करणे सोडलेले असते. हे सर्वजण चंपाषष्ठीचा उपवास सोडून कांदा, वांगी खाण्यास सुरुवात करतात.
खंडेरायासाठी तळी उचलण्याची पद्धत काय?
खंडोबा हे कुलदैवत असलेले भाविक चंपाषष्ठीला किंवा दर अमावस्या, पौर्णिमा, विवाहकार्य किंवा मंगलप्रसंगी तळी उचलतात. यात पाच बाजरीच्या भाकरी (रोडगे) केळीच्या पानावर, ताम्हणात किंवा ताटात ठेवतात. त्यावर वांग्याचे लसूण टाकलेले ङरीत, वरणभात तसेच खोबरे, हळद, रेवडी ठेवतात. नागवेलीच्या पानावर खंडोबाचा टाक ठेवतात. पाच-सात अशा विषम संख्येतील स्त्री-पुरूष ‘सदानंदाचा उदो उदो’ म्हणत ताम्हण तीन वेळा वर खाली करतात. त्यानंतर देवाकडे तोंड करून भंडारा, रेवड्या व खोबरे उधळतात. शेवटी ताम्हण मस्तकाला लावत हे लोक रोडगे प्रसाद म्हणून खातात, अशी माहिती औरंगाबाद येथील सातारा गावातील खंडोबा मंदिरातील पुजारी दिलीप धुमाळ यांनी दिली.
तळी उचलणे हा वाक्प्रचार इथे जन्माला आला..
एका पौराणिक कथेनुसार, मणिसूर, मल्लासूर दैत्यांना मार्तंड देवाने युद्धात हरवले. त्यानंतर ऋषी मुनी, नगरातील लोकांनी मार्तंडाचा जयघोष केला. त्याचे प्रतीक असलेल्या खंडोबाची उपासना म्हणून, खंडेरायाचा जयजयकार म्हणून भरीत-रोडग्याची तळी उचलली जाते. तेव्हापासूनच एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करण्याला तळी उचलणे असे म्हटले जाते. खंडोबाच्या जयजयकारातूनच हा वाक्प्रचार पुढे आला, असे म्हणता येईल.
भारतात 18 स्थाने, खंडोबाच्या वर्षातून चार यात्रा
खंडोबाच्या वर्षभरातून चार यात्रा होतात. चैत्री, पौषी, श्रावणी आणि माघी अशा चार मोट्या यात्रा होतात. संपूर्ण भारतात खंडोबाची एकूण 18 स्थाने आहेत. यात पुणे जुल्ह्यातील जेजुरी हे खंडोबाचे मुख्य पीठ आहे. तर मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील भाविकांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा गावातील खंडोबाचे देवस्थान लोकप्रिय आहे. यासह उस्मानाबादेतील अणदूर, लातूरमधील मतोळ या ठिकाणी स्थाने आहेत.
औरंगाबादमधील मंदिरात 1 लाखाच्या वर भाविक दरवर्षी चंपाषष्ठीला खंडोबाचे दर्शन घेतात. मात्र यंदा निर्बंधांमुळे 80 हजार भाविकच दर्शनासाठी येतील, अशी अपेक्षा मंदिर संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी व्यक्त केली.
इतर बातम्या-